पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बर्वे, सदाशिव गोविंद प्रशासन खंड बर्वे, सदाशिव गोविंद आय.सी.एस.,अर्थमंत्री-महाराष्ट्रराज्य,सचिव-उद्योगखाते,अध्यक्ष-शासनसुधारणाआयोग २७ एप्रिल १९१४ - ६ मार्च १९६७ सदाशिव गोविंद बर्वे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला. त्यांचे वडील (अण्णासाहेब) उपजिल्हाधिकारी व नंतरच्या काळात सांगलीत दिवाण म्हणून काम करत होते. सदाशिव बर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल नाना वाडा येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांत त्यांनी विशेष पारितोषिके मिळवत पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठाची पदवी मिळवली व आयसीएस परीक्षेतील यश प्राप्त केले. त्या वेळी त्यांना परदेशात उत्तम संधी असूनही, लोकसेवा करण्यासाठी बर्वे भारतात परतले. बर्वे यांनी प्रथम अहमदाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यांनी प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (तरुणांच्या) मदतीने आसपासच्या ग्रामीण भागातले रस्तेही श्रमदानाने सुधारले. ही त्यांच्या ‘ऑफ ट्रॅक’ कामाची सुरुवात होती. याच सुमाराला त्यांनी वैयक्तिक जीवनातही परंपरेला छेद देणारा एक निर्णय घेतला. त्यांनी जून १९३८ मध्ये शरयू गुप्ते यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. बर्वे हे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्या सेवेत अधिकारी होते. कायदेभंगाची चळवळ जोमात चालू असताना त्यांनी अगदी ‘तारेवरची कसरत’ केली. सुरत, अहमदाबाद, मुंबई, धारवाड व पुणे येथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. स्वातंत्र्यपूर्व काळात अहमदाबाद येथे झालेल्या धार्मिक दंगलीत त्यांनी कठोर व धाडसाने निर्णय घेतले आणि दंगल आटोक्यात आणली. देश स्वतंत्र होत असताना ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. नियमांच्या चाकोरीत राहूनही कल्याणकारी राज्यकारभार कसा करता येतो, याचे त्यांनी उदाहरण घालून दिले. जुन्या दप्तरांची विल्हेवाट, स्वच्छता सप्ताह, विशिष्ट कालमर्यादेत ठरवून कामे पूर्ण करणे; पूर्ण झालेल्या कामाची कागदपत्रे मुदतीनंतर निकालात काढणे अशी आधुनिक कार्यपद्धती त्यांनी राबवली. म. गांधींची हत्या झाली, त्या वेळी बर्वे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. ज्याने हत्या केली, तो नथुराम गोडसे पुण्याचा. त्या वेळची प्रचंड तणावाची परिस्थिती बर्वे यांनी संयमाने व धाडसाने हाताळली. पुणे महानगरपालिका १९४९ मध्ये अस्तित्वात आली. पुण्याचे पहिले आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्याआधी त्यांनी मुंबई म.न.पा.च्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या कामाचा पाया शास्त्रशुद्ध होता, नियोजन व पूर्वतयारी तपशीलवार असायची, तसेच योग्य कामासाठी सुयोग्य अधिकारी हे सूत्रही पक्के ठरलेले असायचे. पूर्वीच्या नगरपालिकेत पंचवीस वर्षांत जी कामे पूर्ण झाली नाहीत, ती कामे त्यांनी तीन वर्षांत पूर्ण केली. रस्ते, पूल, पाणी, सांडपाणी, वीज, गृहप्रकल्प, दवाखाने, बाजार, उद्याने... असा विविधांगी विचार करून त्यांनी पुढील पंचवीस वर्षांसाठीचा ‘नगर आराखडा’ २९४ शिल्पकार चरित्रकोश