पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

AL पेंडसे, मधुकर दिनकर प्रशासन खंड इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ‘सर्वोत्कृष्ट अभियंता' पुरस्कार

पेंडसे, मधुकर दिनकर मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग २५ ऑक्टोबर १९४०

 मधुकर दिनकर पेंडसे यांचा जन्म कोकणातील वेरळ या खेड तालुक्यातील गावात झाला. वेरळ येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना खेड येथे दाखल व्हावे लागले. कोकणात भरपूर पाऊस, आठ महिने झुळझुळत वाहणारे नदीनाले, हिरवा निसर्ग म्हणूनच मी भावी आयुष्यात जल क्षेत्राकडे वळलो असे सांगणारे पेंडसे, दहावीच्या परीक्षेत  १९५७ मध्ये जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाने पास झाले, व इंटरच्या शिक्षणासाठी ते मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. १९५९मध्ये इंटर झाल्यानंतर त्यांनी वालचंद महाविद्यालय, सांगलीहून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. १९६२ मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि साहाय्यक अभियंता म्हणून ते कोयना जलविद्युत प्रकल्पात रुजू झाले.
 संस्कारक्षम कुटुंबातून आलेल्या पेंडसेंनी आयुष्यभर आपल्या घासातला घास इतरांना देऊन त्यांची दु:खे निवारण्याचे काम केले. समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो आणि आपण ते दिले पाहिजे या जाणिवेने आयुष्यभर झटणार्‍या मधुकर पेंडसेंचे जीवन म्हणजे एक समाजसमर्पित व्रतस्थ जीवन आहे. समाजाला सुखकारक आणि उपयुक्त ठरतील अशाच योजना त्यांनी अमलात आणल्या व सामान्य नागरिकाला अडचणीत आणणार्‍या योजनांमध्येही त्यांनी सुधारणा केल्या. 
 कोयना धरणग्रस्तांच्या प्रकल्प उभारणीत ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी धरणाखाली गेल्या होत्या, त्या जमिनींची नुकसानभरपाईही शासन शेतकर्‍यांना धनादेशामार्फत देत होते. पण  त्या भागातील शेतकरी अशिक्षित होते. त्यांना बँकेचे व्यवहार करता येत नव्हते. यातून सर्रास शेतकर्‍यांची फसवणूक व्हायला लागली. तेव्हा ही नेमकी अडचण एक उत्तम प्रशासक असलेल्या पेंडसे यांच्या लक्षात आली आणि शासनाकडे विनंती करून पेंडसे यांनी या सर्व शेतकर्‍यांना रोख स्वरूपात मोबदला देण्याची व्यवस्था केली.
 याच कोयना प्रकल्पासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याच भागातील तरुणांना नोकर्‍या दिल्या जात. यासाठी दूरदूरच्या खेडेगावांतून अनेक गरीब मुले कार्यालयात येत. बसची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना रात्रीचे तिथेच अडकून पडावे लागत असे. ही त्या गरीब तरुणांची अडचण मधुकर पेंडसे यांनी ओळखली आणि नोकरभरतीसाठी विशिष्ट तारखा ठरवून ज्या भागातून नोकरीसाठी तरुण येत, त्याच भागात त्या दिवसापुरते कार्यालय हलविण्याची व्यवस्था पेंडसे यांनी केली आणि तरुणांना नोकर्‍या दिल्या.
 युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे पेंडसे यांना जल -व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी रशियाला पाठविण्यात आले. पेंडसे यांनी रशियात जाऊन तिथल्या जलव्यवस्थापन शास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्या वेळी भारतात अशा प्रकारचा कुठलाही अभ्यास केला गेला नव्हता. रशियातून अभ्यास करून 

५ २८८ शिल्पकार चरित्रकोश