पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड पेंडसे, मधुकर दिनकर आलेल्या पेंडसे यांनी भारतात पहिल्यांदाच जलविज्ञानाचे कार्यालय उघडले आणि त्याद्वारे अभ्यासाला सुरुवात केली. याद्वारे भारतीय जलाच्या प्रवाह दिशा, त्यांचे ओघ, पाणी साठवण्याची ठिकाणे, बाष्पीभवनाचे प्रमाण अशा वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासाला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर पुढे जलविज्ञानाचे मुख्य कार्यालय नाशिकला उघडण्यात आले आणि व्यापक पातळीवर त्याचा अभ्यास व संशोधन सुरू झाले. याचे जनक आहेत मधुकर पेंडसे.

 पाटबंधारे विभागाच्या पुणे कार्यालयात पेंडसे यांची नियुक्ती झाली. अगदी त्याच दिवशी मुसळधार पाऊस झाला आणि पुण्याच्या जवळील असलेले एक धरण फुटायला सुरुवात झाली. त्याचा धोका रात्रीच्या वेळी अधिक वाढला. त्या धरणावरचा अभियंता घाबरलेला होता. तेव्हा रात्री दोन वाजता कालव्यातून वाहणार्‍या चार फूट पाण्यातून पेंडसे धरणात पोहोचले. हे धरण मातीचे होते. मुसळधार पाऊस सुरू होता आणि धरणाला भेग पडली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच सैन्य बोलवायला हवे याबाबत सगळीकडून पेंडसे यांना विचारले जाऊ लागले. पण हे धरण वाचवता येईल अशी खात्रीच पेंडसे यांनी वरिष्ठांना दिली. पेंडसे स्वत: उपस्थित राहून त्यांनी कर्मचार्‍यांना धीर दिला. कर्मचार्‍यांना मदतीला घेऊन आधी त्यांनी दगड, विटांच्या मदतीने भेग बुजवली. कालव्यातूनही पाणी सोडले आणि धरणफुटीचा धोका टळला.
 सर्वसामान्य जनतेचे सामाजिक प्रश्न व्यवस्थापनाच्या कुठल्याही पुस्तकात लिहिलेले नसतात असे पेंडसे म्हणतात. त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊनच जनतेचे सामाजिक प्रश्न लीलया सोडवले. याच कामाची पेंडसे यांना अप्रत्यक्ष पावतीही मिळाली. बार्शीच्या एका शेतकर्‍याने त्याच्या एका वादाविषयी पेंडसे यांच्या वरिष्ठांना पत्र पाठवले. या पत्रातून ‘प्रकरणाची चौकशी पेंडसे यांच्याकडे सोपवावी, तरच मला योग्य न्याय मिळू शकेल,’ असे त्याने लिहिले होते. शेतकर्‍याचे हे पत्र म्हणजे पेंडसे यांच्या सत्यनिष्ठ कामाची पावती होती.
 “नेता तोच असतो जो संकटाच्या वेळी सर्वांच्या पुढे असतो, आणि सुखाच्या वेळी सर्वांच्या पाठीशी असतो,” हे वाक्य पेंडसे यांच्या तोंडी सदैव असते. प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा ते त्याच पद्धतीने जगले आणि एक अनुकरणीय आदर्श समाजासमोर ठेवला. 
 १९९०मध्ये कोयना लेक टॅप स्टेज-४ कामावर त्यांची नियुक्ती झाली. या वेळी जमिनीअंतर्गत भुयार पाडून धरणाच्या मधोमध लेक टॅप घ्यावयाचा होता, अगदी या वेळी धरणाचे पाणी व भुयार यांच्यामध्ये लेक टॅपच्या ठिकाणी केवळ सहा मीटर अंतर उरले होते. या वेळी धरणालाही धोका होता. 
 हा फारच अटीतटीचा प्रसंग होता. सर्व कामगार घाबरत होते. तेव्हा त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून मधुकर पेंडसे मागचा-पुढचा विचार न करता त्या ठिकाणी जाऊन थांबले. त्यांनी योग्य वेळी देखरेख केली आणि तो लेक टॅप अतिशय चांगल्याप्रकारे यशस्वी झाला. या वेळी पेंडसे त्या ठिकाणी मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
 आपल्या संपूर्ण आयुष्यात कर्तव्यदक्ष आणि समाजहितदक्ष असलेल्या पेंडसे यांना १९९८ सालचा इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचा ‘सर्वोत्कृष्ट अभियंता’ हा पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतर पेंडसे हे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी तत्त्वावर लहान स्वरूपात वीजनिर्मिती कशी करता येऊ शकते यावर संशोधन करून, शासनामार्फत ते अमलात आणण्याचे काम करत आहेत. याच हायड्रो पॉवर असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य आहेत. या माध्यमातून ते वेगवेगळ्या परिषदा भरवणे, परिषद परिसंवादात सहभाग घेणे आदी संशोधनात्मक महत्त्वपूर्ण काम करीत असतात.

- दत्ता कानवटे

शिल्पकार चरित्रकोश २८९ प ।