पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड परांजपे, केशव गणेश प परांजपे, केशव गणेश मुख्य सचिव - महाराष्ट्र राज्य १७ सप्टेंबर १९३०

 केशव गणेश परांजपे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश राजाराम परांजपे व आईचे नाव सरस्वती (ऊर्फ शांता). त्यांचे प्राथमिक शिक्षण कल्याण नगरपालिकेच्या शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कल्याण येथील माध्यमिक विद्यालयात झाले. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. 
 वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून वकील व्हावे या उद्देशाने त्यांनी प्रथम शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई येथे अध्ययन करून मुंबई विद्यापीठाची एलएल.बी. ही पदवी मिळवली. प्रख्यात विधिज्ञ कै. नानी पालखीवाला, तसेच प्रि. टी.के. टोपे हे विधि महाविद्यालयातील प्राध्यापक होते. वकिलीची सनद प्राप्त केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शहरातच दिवाणी  न्यायालयात वकिली सुरू केली व थोड्या काळातच आपला जम बसविला.
 आय.ए.एस. परीक्षेत उत्तीर्ण होणे तितकेसे सोपे नाही व त्या परीक्षेत बुद्धीची कसोटी लागते अशी काहीशी त्यांची धारणा होती. तेव्हा या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण होता येते की नाही हे अजमावून पाहण्यासाठी ते परीक्षेला बसले व उत्तीर्ण झाले. त्यानंतर प्रशासन सेवेत रुजू व्हावे की वडिलांबरोबर वकिलीचा व्यवसाय चालू ठेवावा, असा प्रश्न उभा राहिला. अनेक मित्रांनी व हितचिंतकांनी वकिली चालू ठेवावी असा सल्ला दिला. मात्र, प्रशासकीय सेवेत आपल्या देशासाठी व जनतेसाठी खूप काही करण्याची संधी असते असे वाटल्यानंतर ते भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. 
 त्यांच्या सेवेचा प्रारंभ सध्याच्या गुजरात राज्यात (तत्कालीन द्वैभाषिक राज्य) बडोदा (वडोदरा) येथे झाला. त्यांची पहिली नेमणूक अधिसंख्य साहाय्यक समाहर्ता म्हणून बडोदा येथे झाली. त्यानंतर त्यांनी साहाय्यक समाहर्ता म्हणून ध्रंगध्रा, जि. झालवाड म्हणजे सध्याचे सुरेंद्रनगर पलिताना येथे व त्यानंतर विक्रीकर साहाय्यक आयुक्त, अहमदाबाद या पदावर गुजरात राज्यात सेवा केली. गुजरातमध्ये राहून गुजराती भाषा त्यांनी चटकन आत्मसात केली. राज्यकारभाराची भाषा गुजराती असल्याने महसूल प्रकरणातील निकालपत्रे त्यांनी गुजरातीत लिहिली व भाषणेदेखील गुजरातीत लिहिली. गुजराती लोक मेहनती व प्रेमळ स्वभावाचे असतात याचा त्यांना अनुभव  आला.
 भाषावार प्रांतरचनेनुसार १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांची प्रथम मुंबई येथे विक्रीकर विभागाच्या साहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली. पुढील चार महिन्यांतच त्यांना पदोन्नती मिळाली व त्यांची पुणे येथे विक्रीकर उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. पुणे येथे विक्रीकर उपायुक्त या पदावर त्यांनी सुमारे दोन वर्षे काम केले. त्या वेळी अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून गणले गेलेले एम.एन. हेबळे हे 

शिल्पकार चरित्रकोश २८१