पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड धर्माधिकारी, अविनाश भगवंत | ध । धर्माधिकारी, अविनाश भगवंत मुख्यमंत्र्यांचे सचिव २ ऑगस्ट १९५९

 अविनाश भगवंत धर्माधिकारी यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मंगला होते. त्यांचे वडील भगवंतराव  सामाजिक वनीकरण खात्यात टंकलेखक होते. पुण्यातील कसबा पेठेत जुन्या वाड्यात एका खोलीत अविनाश यांचे बालपण गेले. 
 घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. पण संस्कारांची श्रीमंती मात्र त्यांना भरपूर मिळाली. परिस्थितीशी दोन हात करताना आक्रमक वृत्तीचे बाळकडू याच वयात मिळाले. पुढे प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख प्रशासनाचे अनेक प्रयोग ठामपणे राबवताना आणि योग्य कारणासाठी पाय रोवून उभे राहताना हीच प्रवृत्ती कामी आली. केवळ ‘स्वच्छ’ आणि ‘कार्यक्षम’ असतानाच अभ्यासपूर्ण आक्रमकताही असायला हवी, हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्यकालात दाखवून दिले.
 ‘देशाचा कार्यकर्ता’ होण्याचे स्वप्न वयाच्या सोळाव्या वर्षी पाहिल्यावर अविनाश यांनी जाणीवपूर्वक वाणिज्य आणि कलाशाखेचा रस्ता धरला. बी.कॉम., एम.ए. (इतिहास), एम.ए. (अर्थशास्त्र), एम.फिल. अशा पदव्या घेताना एकीकडे ज्ञानप्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून काम चालू होते आणि मुक्त पत्रकारिताही सुरू होती. सामान्य लोकांपासून नेत्यांपर्यंत सर्वांशी बोलून त्यावर मुख्यत: ‘माणूस’ साप्ताहिकात लेखन करायचे. पंजाब, आसाम, काश्मीर व दिल्लीतील राजकारण, शहाबानो प्रकरण, गुजरातमध्ये पेटलेले राखीव जागांविरोधी आंदोलन आणि महाराष्ट्रातली शेतकरी चळवळ, अयोध्या विवाद या सर्वांवर त्यांनी जे अभ्यासपूर्ण लेखन केले, त्यातूनच त्यांचे पहिले पुस्तक ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ आकाराला आले व त्याला पुढे राज्यशासनाचा उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार मिळाला. 

या कार्यकर्ता काळातच त्यांची सहधर्मचारिणी पूर्णा त्यांना भेटली. तिनेही पंजाबमध्ये दोन वर्षे राहून राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम केले होते.

 देशस्थितीचा अभ्यास करतानाच अविनाश  धर्माधिकारी यांना जाणवले, की अंतरात कार्यकर्त्याचीच  प्रेरणा ठेवून हातात जर प्रशासकीय अधिकार्‍याचे अधिकार आले, तर अधिक ठोस परिवर्तन घडवता येईल. म्हणून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि ते आयएएससाठी निवडले गेले. महाराष्ट्र केडर मिळाले, तसेच एकाहून एक मोक्याच्या जागांवर नियुक्त्या होत गेल्या.
 स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधीजींना गुरुस्थानी मानणार्‍या धर्माधिकारींनी ‘अंत्योदया’च्या सूत्रानुसार प्रशासनाला सामान्य जनतेला उत्तरदायी, म्हणजेच ‘लोकाभिमुख’ करण्याचे काम सुरू केले. महसूल अधिकारी या नात्याने त्यांच्यासमोर जमिनींच्या दाव्यांचे खटले निकालासाठी यायचे. .
 वर्षानुवर्षे निकालच न लागता पडून असलेल्या हजारो खटल्यांचा जलद गतीने, पण योग्य व न्याय्य निकाल लावण्यासाठी त्यांनी ‘महसूल न्यायालय’ हा

शिल्पकार चरित्रकोश २७९