पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड देशमुख, चिंतामण द्वारकानाथ देशमुख, चिंतामण द्वारकानाथ आय.सी.एस.,स्वतंत्रभारताचेपहिलेअर्थमंत्री, गव्हर्नर-भारतीय रिझर्व्ह बँक १४ जानेवारी १८९६ - २ ऑक्टोबर १९८२ चिंतामण द्वारकानाथ (सी. डी.) देशमुख त्यांचा जन्म किल्ले रायगडाजवळील नाते या गावी झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ व्यवसायाने वकील, तर आई भागीरथी धार्मिक वृत्तीची गृहिणी होती. आईचे संस्कार आणि वडिलांचे मार्गदर्शन या बळावर चिंतामणीच्या बुद्धिमत्तेने मोठी झेप घेतली. जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती सर्वांत प्रथम मिळवणार्‍या या विद्यार्थ्याने पुढे देश-परदेशांतल्या सगळ्याच परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवत नंतर आपल्या कारकिर्दीत कार्यक्षम सनदी अधिकारी ते स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री पद भूषवून या देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रायगड जिल्ह्यातल्या आडवळणाच्या गावात असूनही खडतर परिस्थितीपुढे हार न मानता वेळप्रसंगी परीक्षेसाठी मैलोन्मैल अंतर पायी तुडवत सी.डी. देशमुखांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले. केम्ब्रिज विद्यापीठातून १९१७ मध्ये त्यांनी वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र हे विषय घेऊन नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. विद्यापीठात ते पहिले आले. लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे १९१८ मध्ये देशमुखांनी भारतीय नागरी सेवा ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. नागरी सेवेत दाखल झाल्यानंतर चिंतामणराव देशमुख यांची प्रशासकीय कारकीर्द जवळपास २१ वर्षांची होती. सी.डी. देशमुख यांची पहिली नेमणूक १९१८ मध्ये आत्ताचा विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड म्हणजेच त्या वेळचा मध्यप्रांत आणि वर्‍हाड या राज्यांत झाली होती. पुढे ते या राज्याचे महसूल सचिव आणि वित्त सचिव या पदापर्यंत पोहोचले. या पदापर्यंत पोहोचणारे ते सर्वांत कमी वयाचे प्रशासकीय अधिकारी असावेत. याच दरम्यान सुट्टीवर लंडनला असताना त्यांनी दुसर्‍या गोलमेज परिषदेत सचिव म्हणून काम पाहिले होते. या गोलमेज परिषदेत महात्मा गांधीही सहभागी झाले होते. मध्यप्रांत आणि वर्‍हाडच्या वतीने तत्कालीन केंद्र-सरकारला सादर केलेल्या निवेदनाबद्दल त्यांना १९३५ मध्ये केंद्र - राज्य वित्तीय संबंधांसाठीचा पुरस्कार मिळाला होता. जुलै १९३९ मध्ये देशमुख यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेत लियाझन ऑफिसर म्हणून झाली. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातला दुवा म्हणून ते काम पाहू लागले. तीन महिन्यांनंतरच ते केंद्रीय बँक मंडळाचे सचिव झाले. डिसेंबर १९४१ मध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला आणि दि. ११ ऑगस्ट १९४३ रोजी सी.डी. देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. ते रिझर्व्ह बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. त्यांच्याच कार्यकाळात दि. १ जानेवारी १९४९ रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले. या परिवर्तनासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया त्यांच्याच देखरेखीखाली पूर्ण झाली. १९४९ साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा अधिकोषण कंपन्यांच्या नियमांसाठीचे कायदे तयार करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. स्वतंत्र भारताची पहिली वित्तसंस्था, औद्योगिक वित्त महामंडळ अर्थात इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (आयएफसीआय) स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागात पतपुरवठ्याची यंत्रणा मजबूत करण्यासाठी देशमुख यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांच्या या योगदानामुळे कृषी क्षेत्राला कर्जपुरवठा सुकर झाला शिल्पकार चरित्रकोश २७३