पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवरे, सुधीर तुकाराम प्रशासन खंड

 १९९५ साली सुधीर देवरेंची इंडोनेशियात भारताचे राजदूत म्हणून नेमणूक झाली. हे फार वरिष्ठ पद समजले जाते. एक विस्तृत देश, जगात सर्वांत अधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश, ‘आसियान’मधली मुख्य सत्ता व भारताशी अनेक सूत्रांनी प्राचीन काळापासून जोडलेला देश. जकार्ता हे आसियानचे मुख्य कार्यालय आहे. आसियानबरोबर संबंध प्रस्थापित करण्यात, ‘आसियान रीजनल फोरम’मध्ये भारताचा समावेश करण्यात व आसियानबरोबरची ‘संवाद भागीदारी’ (डायलॉग पार्टनरशिप) यांत देवरे यांचा फार महत्त्वपूर्ण कार्यभाग होता. या काळात भारत व इंडोनेशिया दरम्यान अनेक करार झाले व संबंध खूप दृढ झाले. 
 १९९८ साली सुधीर यांची विदेश मंत्रालयात अर्थसंबंधी सचिवपदी नियुक्ती झाली. विदेश मंत्रालयात एकूण तीन सचिव असतात व ते विदेश धोरणाची धुरा सांभाळत असतात. १९९८ ते २००१ या साडेतीन वर्षांच्या दीर्घ काळात सुधीर देवरे विदेश मंत्रालयात सचिव पदावर होते. आशिया, आफ्रिका यांतले देश, अनेक आंतरराष्ट्रीय संस्था यांबाबतची त्यांच्यावर थेट जबाबदारी होती. अनेक परिषदांत ते भारताचे प्रतिनिधित्व करीत असत. त्या काळात ‘लुक ईस्ट’ हे पौर्वात्य देशांवरचे नवे धोरण प्रस्थापित झाले, त्यात देवरेंचा मोठा हातभार होता. ते धोरण यशस्वी झाले असून आज भारताला फार उपयोगी पडत आहे. 
 फिजी या पॅसिफिक महासागरातल्या देशात २००० साली, जेव्हा पुंडगिरीमुळे भारतीय वंशाच्या पंतप्रधानास पदच्युत केले गेले व हिंसेचे वातावरण निर्माण झाले, तेव्हा भारत सरकारतर्फे फिजीतल्या भारतीय समाजासोबत संवाद चालू ठेवण्यासाठी देवरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. 
 २००१ साली देवरे यांची विदेश मंत्रालयातली कारकीर्द संपली; पण नंतरच्या दहा वर्षांत त्यांनी भारतातल्या व परराष्ट्रांतल्या अनेक नामवंत संस्थांमध्ये उच्च पदांवर काम केले व आजही ते  करीत आहेत.
 २००१ ते २००३ या काळात देवरे ‘राष्ट्रीय सुरक्षाविषयक सल्लागार मंडळ’ (नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायजरी बोर्ड) या आपल्या देशातल्या सर्वोच्च सिक्युरिटी संस्थेचे सदस्य होते. २००२ साली दिल्लीच्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ते अभ्यागत प्राध्यापक होते. पूर्व आशिया अध्ययनाविषयी ते मार्गदर्शन करीत असत. आर.आय.एस. ह्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधाबाबतच्या दिल्लीतल्या सुप्रसिद्ध संस्थेचे २००२ ते २००६ या काळात ते उपाध्यक्ष होते. 
 २००३ मध्ये त्यांना सिंगापूरच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ साउथ-ईस्ट एशियन स्टडीज’ने ‘व्हिजिटिंग सीनियर फेलो’ म्हणून सिंगापूरला आमंत्रित केले.  देवरे यांनी तिथे २००६ पर्यंत काम केले. या काळात त्यांनी दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांवर काम केले. ‘इंडिया अ‍ॅण्ड साउथ-ईस्ट एशिया : टोवर्ड्स सिक्युरिटी कन्व्हर्जन्स’  हे पुस्तक त्यांनी २००५ मध्ये लिहिले व ‘ए न्यू एनर्जी फ्रॉण्टियर : दी बे ऑफ बेन्गॉल रीजन’  हे पुस्तक संपादित केले. सिंगापूरमध्ये असताना त्यांनी अनेक लेख लिहिले व भाषणे दिली. २००७ मध्ये अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना ‘फेलो’ म्हणून आमंत्रित केले. एक वर्ष त्यांनी त्या विद्यापीठात काम केले. 
 भारतात परत आल्यावर २००९ साली ‘इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स’ या नामवंत संस्थेने (पंडित नेहरूंच्या प्रेरणेतून १९४३ साली ही संस्था निर्माण झाली. भारतातील आंतरराष्ट्रीय अभ्यासाबाबतची ही सर्वांत जुनी व प्रसिद्ध संस्था आहे) त्यांना महासंचालक या पदाची धुरा सांभाळण्यासाठी खास आमंत्रण दिले. सुधीर आजही तिथे कार्यरत आहेत. भारताचे उपराष्ट्रपती या संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या ६७ वर्षांच्या संस्थेच्या इतिहासात सुधीर देवरे हे पहिलेच मराठी ‘डायरेक्टर जनरल’ आहेत. 

- हेमा देवरे

शिल्पकार चरित्रकोश २७२