पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवरे, सुधीर तुकाराम प्रशासन खंड भारताचा राजदूत त्या देशातला भारताचा सर्वोच्च प्रतिनिधी असतो. मराठी माणसाने हे पद मिळवणे म्हणजे अवघड काम होय. त्यात जी निवडक माणसे यशस्वी झाली, त्यांत सुधीर देवरे हे एक महत्त्वाचे नाव आहे. तुकाराम आणि सुमती देवरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सुधीर तुकाराम देवरे यांचा जन्म सोलापूर येथे झाला. वडिलांचे देवरे घराणे मराठवाड्यातल्या करडखेड इथले, तर मातोश्रींचे एकबोटे घराणे तुळजापूर या क्षेत्रस्थानाचे.

 सुधीर देवरे यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील नूतन मराठी शाळेतून झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षणात सुधीर केवळ अभ्यासातच नव्हे, तर वक्तृत्वामध्येही आघाडीवर राहिले. त्यांनी आंतरशालेय वादविवाद स्पर्धांमध्ये सतत बक्षिसे मिळवली. १९५० साली मॅट्रिकला गुणवत्ता यादीत आठव्या क्रमांकावर येऊन सुधीर देवरे यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले, तर १९५९ साली मॅट्रिकला त्यांची धाकटी बहीण सुधा, बोर्डात पहिली आली. या बहीण-भावंडांची नावे मॉडर्न हायस्कूलच्या पटलावर नोंदली गेली. मात्र दोघांचे हे यश बघायला वडील हयात नव्हते. पुणे येथील वाडिया महाविद्यालयात उपप्राचार्यपदाची धुरा सांभाळत असतानाच त्यांचे निधन झाले.
 सुधीर देवरे यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालय, नंतर मुंबईतील पार्ले महाविद्यालय व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून भूगोल व रसायनशास्त्र हे विषय घेऊन बी.एस्सी.च्या परीक्षेत उच्च गुण प्राप्त केले. या काळात पार्ले महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सी.बी. जोशी यांचा प्रशासन सेवेबद्दल सुधीर यांच्या मनात आवड निर्माण करण्यात मोठा वाटा होता. १९५४ साली सुधीर यांची आय.ए.एस.च्या परीक्षेत निवड झाली. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होतीच. सर्व विषयांचा चौफेर अभ्यास करण्याचीही आवड होती. घरातले कौटुंबिक वातावरणही त्यासाठी पोषक असेच होते. प्रखर देशभक्तीचे उपजतच बाळकडू मिळालेले! आंतरराष्ट्रीय विश्वासंबंधीचे कुतूहल, टेनिस, बॅडमिंटन, ब्रिज यांसारखे खेळ यांची पार्श्वभूमी वाडिया महाविद्यालयाच्या परिसरात तयार झालेली होतीच. आय.ए.एस.च्या परीक्षेला बसण्याची तयारी चालू असताना चीनने आक्रमण केले, त्यामुळे देशभक्तीची लाट उफाळली होती. आय.ए.एस.मध्ये निवड झाल्याने देशसेवेची संधी मिळाली. त्यांनी विदेशसेवा हे क्षेत्र आणि रशियन भाषेचे सुरुवातीपासून आकर्षण वाटत असल्याने ती निवडली.
 १९६५ साली डॉ. ना.र. देशपांडे यांची कन्या हेमा हिच्याशी विवाहबद्ध होऊन सुधीर देवरे मॉस्कोला रवाना झाले. भाषा शिक्षण आणि विदेशसेवेचे प्रशिक्षण यांची सुरुवात सोबतच झाली. इंदिरा गांधींची १९६६ सालची मॉस्को भेट हा विदेश सेवेतला पहिला अध्याय होता. पुढे वॉशिंग्टन, सिक्किम, जिनिव्हा, ब्रह्मदेश, दक्षिण कोरिया, जर्मनी, युक्रेन आणि इंडोनेशिया अशा अनेक ठिकाणी देवरे यांच्या बदल्या झाल्या. युरोप आणि आशिया असा क्रम राहिला. त्या देशांशी भारताचे राजनैतिक व आर्थिक संबंध वृद्धिंगत करणे आणि दोन्ही देशांना आपल्या कार्याने जवळ आणणे हा त्यांचा प्रयत्न प्रत्येक देशात कायम राहिला. 
 १९७० ते १९७४ हा सिक्किममधला काळ भारताच्या इतिहासातला फार महत्त्वाचा टप्पा ठरला. या काळातच तिथली राजसत्ता संपुष्टात येऊन लोकशाही आली आणि त्यानंतर सिक्किम भारताचे एक राज्य बनले. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही फार मोठी घटना होती. तेथील घडलेल्या घडामोडींमध्ये अप्रत्यक्षरीत्या देवरे यांना फार मोठी भूमिका बजावावी लागली.  विदेश मंत्रालयात जॉइंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी १९८२-१९८५ या काळात

२७० शिल्पकार चरित्रकोश