पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड देवरे, सुधीर तुकाराम निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर कामे केली. भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजना समितीचे ते सदस्य होते. भारतातील धरणाच्या, पाटबंधारे प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासंबंधीच्या तंट्यात त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले.

 किल्लारी भूकंपानंतर बाधित झालेल्या धरणांच्या मजबुतीकरणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने गठित केलेल्या अभ्यासगटाचे ते सल्लागार होते.
 महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे आणि जलसिंचन विभाग, तसेच कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाच्या सल्लागारपदी त्यांची नेमणूक झाली होती. सर्वोच्च न्यायालयातील आंतरराज्य पाणी तंट्याच्या संदर्भात राज्य सरकारचे सल्लागार, मार्गदर्शक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 
 भारतात आणि भारताबाहेरील अनेक परिषदा, संमेलनांत उपस्थित राहून त्यांनी ‘शोधनिबंध’ वाचले आहेत.
 १९८५ च्या मार्च महिन्यात पाटबंधारे प्रकल्पासाठीच्या कर्जासाठी जागतिक बँकेशी सल्लामसलत करण्यासाठी वॉशिंग्टनला गेलेल्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. जलसिंचनाच्या विकासाच्या संदर्भात इंटरनॅशनल इरिगेशन सेंटर, लोगन येथील जुलै १९८५ मध्ये झालेल्या कार्यशाळेला देवकुळे उपस्थित होते. १९८७ मध्ये मोरोक्को येथे भरलेल्या जलसिंचन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या तेराव्या परिषदेला ते हजर होते. तलाव-सरोवरांच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी १९९० च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी अमेरिकावारी केली. 
 कलकत्त्याच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स’या संस्थेचे ते फेलो होते. राऊरकेलाच्या ‘इंडियन वॉटर रिसोर्स सोसायटी’ आणि नवी दिल्लीच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चे तहहयात सदस्य होते. त्याचप्रमाणे दिल्लीच्या ‘इंडियन काउन्सिल ऑफ आर्बिट्रेशन’चेही ते सदस्य होते.
 वैयक्तिक आयुष्यातही ‘शिस्तबद्ध’ पद्धतीने जगलेले श्रीकांत देवकुळे यांना हॉकी, बॅडमिंटन या खेळांत विशेष रुची होती. ते उत्कृष्ट खेळाडू होते. कोणतीही गोष्ट करताना मग वैयक्तिक भटकंती वा पर्यटनही असो, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती मिळवून निश्चित आखणी करावी, असा देवकुळेंचा आग्रह असे. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. 

- प्रकाश कामत

देवरे, सुधीर तुकाराम भारतीय परराष्ट्र सेवा सहसचिव, अर्थसचिव-विदेश मंत्रालय, राजदूत, महासंचालक - इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स ५ जून १९४१

 आंतरराष्ट्रीय जगताचे आकलन, राजकारणाची एक अंगभूत जाणीव, देशाची वकिली करण्याची कुशलता या तीन घटकांनी बनलेले रसायन म्हणजे विदेशनीती. अशा या चाणक्याच्या विश्वात गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवणे ही कामगिरीच काहीशी असामान्य! 

शिल्पकार चरित्रकोश २६९