पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवकुळे, श्रीकांत त्र्यंबक प्रशासन खंड यांचे वडील गुजरातमध्ये, आणंद जवळील वल्लभ विद्यानगरीच्या एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दाखल झाले. त्यामुळे श्रीकांत देवकुळे यांचे महाविद्यालयीन शिक्षण वल्लभ विद्यानगरी येथे झाले. त्यांनी महाविद्यालयीन परीक्षांत नेहमीच पहिली श्रेणी आणि वरचा क्रमांक कायम ठेवला. १९५६ साली देवकुळे गुजरात विद्यापीठाची बी.ई. स्थापत्यची परीक्षा प्रथम श्रेणीत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. पदवी मिळविल्यानंतर एक वर्षभर ते वल्लभ विद्यानगरीच्या सरदार वल्लभभाई महाविद्यालयात शिकवत होते. काही काळ त्यांनी बडोद्याला (वडोदरा) सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीसुद्धा केली. १९५९ साली देवकुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिले आले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ते महाराष्ट्रात येऊन पाटबंधारे खात्यात साहाय्यक अभियंतापदी रुजू झाले.

 मे १९५९ ते ३१ ऑगस्ट १९९३ या काळात देवकुळे यांनी पाटबंधारे खात्यात विविध पदांवर राहून महत्त्वपूर्ण आणि  उल्लेखनीय कामे केली. १९५९ ते १९६३ पर्यंत साहाय्यक अभियंता म्हणून त्यांची गंगापूर धरणावर नेमणूक झाली. १९६३ साली कार्यकारी अभियंता म्हणून त्यांना बढती मिळाली. १९६३ ते १९६८ दरम्यान मातीच्या धरणाचे तज्ज्ञ म्हणून त्यांनी धरणाचे नकाशे तयार केले. १९६८ च्या ऑगस्ट महिन्यात पानशेत धरणाच्या पुनर्निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. मे १९७१ पर्यंत त्यांच्या देखरेखीखाली पानशेत आणि खडकवासला धरणांची नव्याने उभारणी करण्याचे काम झाले. 
 जून १९७१ ते जुलै १९७६ पर्यंत पाटबंधारे खात्याच्या सातारा विभागाच्या ‘अधीक्षक अभियंता’ या पदावर त्यांची नेमणूक झाली. त्यांनी त्या काळात कृष्णा, वारणा आणि दूधगंगा पाटबंधारे योजनांना गती दिली.
 देवकुळे यांनी जुलै १९७६ पासून जानेवारी १९८० पर्यंत अधीक्षक अभियंता आणि उपसचिव म्हणून कार्यभाग सांभाळला. 
 १९८० नंतर वर्षभर मुख्य अभियंता आणि सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या काळात बी.एम.आर.डी. आणि पाणी पुनर्वापर व्यवस्थापनाच्या संदर्भात देवकुळेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मुंबई महानगरातील पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनासंबंधीच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी उपाययोजना सुचविल्या.
 श्रीकांत देवकुळे फेब्रुवारी १९८१ ते १९८५ दरम्यान औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता असताना मराठवाडा विभागातील मांजरा, तेरणा आणि दुधना प्रकल्प मार्गी लागले.
 मे १९८७ पासून पाटबंधारे खात्यात ते मुख्य अभियंता आणि सचिवपदी कार्यरत होते, तर ११ मे १९९२ पासून ३१ ऑगस्ट १९९३ पर्यंत देवकुळे पाटबंधारे खात्याचे मुख्य सचिव होते.
  त्यांच्या पस्तीस वर्षांच्या सेवेत राज्यातील महत्त्वाचे मोठे मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्प आकाराला आले. धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय कामकाज, प्रकल्पाची निवड, धरणांची आखणी, उभारणी या सार्‍याच बाबतीत श्रीकांत देवकुळे यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात असे. मातीच्या धरणांची आखणी, उभारणी आणि देखभाल यांतील तज्ज्ञ अशी खात्यात त्यांची प्रतिमा होती.
 जागतिक बँक, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल  डेव्हलपमेंट, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी आदि संस्थांकडून मिळणार्‍या मदतीवर आधारित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीची धोरणे ठरविण्याचे, त्या प्रकल्पाची आखणी-नियोजन करून ते उभे करण्याचे कामही देवकुळे यांनी केले आहे.

२६८ शिल्पकार चरित्रकोश