पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आंबेडकर, भीमराव रामजी

न्यायपालिका खंड

 वडील रामजी ब्रिटिश सैन्यात सुभेदार-मेजर होते. त्यांच्या सतत बदल्या होत असत. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा रामजी सुभेदार महू येथे होते. बाबासाहेब हे सुभेदार रामजींचे चौदावे अपत्य. बाबासाहेबांचे शालेय शिक्षण सातारा आणि मुंबई येथे झाले. सातार्‍याच्या माध्यमिक शाळेतील पेंडसे आणि आंबेडकर या दोन शिक्षकांचे बाबासाहेबांवर अतिशय प्रेम होते. बाबासाहेबांचे घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे मूळ आडनाव सकपाळ असे होते. सातार्‍याच्या शाळेत बाबासाहेबांचे आडनाव आंबवडेकर असे लावलेले होते. आंबेडकर गुरुजींनी ते बदलून त्याऐवजी स्वत:चे आंबेडकर हे आडनाव नोंदविले आणि तेव्हापासून बाबासाहेबांचे आडनाव आंबेडकर असे झाले.
 १९०७ मध्ये बाबासाहेब मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या काळात मॅट्रिकची परीक्षा कठीण समजली जाई. बाबासाहेब हे दलित समाजातील मॅट्रिक झालेले पहिले विद्यार्थी होत. मॅट्रिकनंतर बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे इंटरनंतर त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांची शिष्यवृत्ती मिळाली. आजारपणामुळे त्यांचे एक वर्ष वाया गेले, परंतु १९१२ मध्ये बाबासाहेब बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

 पदवी मिळविल्यानंतर बाबासाहेबांनी काही दिवस बडोदा संस्थानात नोकरी केली. अनेक अडचणी असल्या, तरी परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. पुन्हा एकदा त्यांना सयाजीराव महाराजांनी शिष्यवृत्ती दिली आणि जुलै १९१३ मध्ये बाबासाहेब न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले. तेथे अफाट अभ्यास करून त्यांनी १९१५ साली एम.ए. आणि १९१६ मध्ये पीएच.डी. या पदव्या संपादन केल्या. नंतर लगेच इंग्लंडला जाऊन कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा आणखी अभ्यास करण्याची बाबासाहेबांची इच्छा होती, परंतु बडोदा सरकारच्या अनपेक्षित तगाद्यामुळे १९१७ मध्ये त्यांना भारतात परत यावे लागले. काही दिवस बडोद्याला नोकरी केल्यानंतर ते मुंबईला परत आले. त्यांना सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापकाची जागा मिळाली. तेथल्या पगारातून बचत करून, कोल्हापूरच्या महाराजांकडून काही साहाय्य घेऊन आणि इतर काही व्यवस्था करून जुलै १९२० मध्ये बाबासाहेब इंग्लंडला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून जून १९२१ मध्ये एम.एस्सी. आणि १९२२-२३ मध्ये डी.एस्सी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या. १९२२ मध्ये ते ‘ग्रेज् इन्’मधून बॅरिस्टर झाले.

 अध्ययन पूर्ण करून स्वदेशी परतल्यानंतर जुलै १९२३ मध्ये डॉ. आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. वकिलीचा व्यवसाय हा उपजीविकेचे साधन म्हणून त्यांनी स्वीकारला होता. सुरुवातीच्या काळात त्यांना विशेष काम मिळाले नाही. त्यामुळे ते जिल्हा न्यायालयातील कामही स्वीकारीत असत. त्यांचे वकिलीचे कार्यालय सोशल सर्व्हिस लीगच्या इमारतीत एका लहानशा खोलीत होते.

 १९२६ मध्ये पुण्यातील बागडे, जेधे आणि जवळकर या तीन ब्राह्मणेतर पुढार्‍यांविरुद्ध पुण्यातील काही ब्राह्मणांनी मानहानीचा दावा दाखल केला. या पुढार्‍यांनी ‘देशाचे दुश्मन’ या नावाचे पुस्तक लिहिले होते आणि त्यात ‘ब्राह्मणांनी भारताचा नाश केला’ असे प्रतिपादन केले होते. या तिघांनी आपले वकीलपत्र डॉ. आंबेडकरांना दिले. फिर्यादी पक्षाचे वकील ल.ब. भोपटकर होते. बाबासाहेबांनी हा खटला अतिशय कौशल्याने लढविला आणि जिंकला. तेव्हापासून एक कुशल आणि हुशार वकील म्हणून ते ओळखले जाऊ लागले.


२६ शिल्पकार चरित्रकोश