पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड तिनईकर, सदाशिव शंभूराव देण्याची पद्धत तिनईकरांनी बंद केली. त्या वेळचे मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष पुष्पकांत म्हात्रे यांच्याशी तिनईकरांचा बराच संघर्ष झाला. तरीही म्हात्रे यांनी तिनईकरांनी नगरसेवकांमध्ये व व्यवस्थापनात आणलेल्या शिस्तीचे कौतुक केले आहे आणि त्याचे श्रेय त्यांच्या स्वच्छ व स्पष्ट कारभाराला दिले आहे. तिनईकरांची जेव्हा मुंबई आयुक्तपदी नेमणूक झाली, तेव्हा महानगरपालिकेत अनेक आर्थिक प्रश्न व रेंगाळलेले प्रकल्प होते. पण त्यांनी महापालिकेला यातून बाहेर काढले. १९६६ ते १९७० या कालावधीत कोणाही आय.ए.एस. अधिकार्‍याला मिळाली नसेल अशा कामाची संधी तिनईकर यांना लाभली. ती म्हणजे, पुणे येथील पशुवैद्यकशास्त्र संस्थेचे संचालक या पदावर नियुक्त झालेले ते पहिलेच आय.ए.एस. अधिकारी म्हणावे लागतील. मुंबई महानगरपालिकेत आयुक्त पदावर असताना त्यांनी त्यांचे समकालीन आय.ए.एस. अधिकारी द.म. सुकथनकर यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसंबंधीचा अहवाल तयार केला होता. परंतु त्यांनी अहवालात केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. १९९० मध्ये तिनईकर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना निवृत्त झाले. ते त्यांच्या सहकार्‍यांची नेहमीच पाठराखण करीत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. त्यांच्या स्वच्छ व स्पष्ट कारभारामुळे राज्य सरकारने तिनईकरांना आयुक्तपदावरून बढती देऊन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नेमले. मुंबई महानगरपालिकेच्या १०० वर्षांच्या इतिहासात अशी बढती मिळणारे ते एकमेव आयुक्त आहेत. तिनईकर यांच्यासारख्या समाजाभिमुख प्रशासकीय अधिकार्‍याला महानगरपालिकेतून निरोप देताना मुंबईच्या नागरिकांतर्फे त्यांचा भव्य सत्कार झाला. ही जनतेच्या प्रेमाची पावती होय. सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकार्‍याने काय करावे असा प्रश्न तिनईकर यांना कधीच पडला नाही. मुंबईच्या जसलोक रुग्णालयाचे मानद प्रशासक म्हणून त्यांनी नि:शुल्क काम करायला सुरुवात केली. त्याच काळात ‘लोकसत्ता’ ह्या दैनिकात तिनईकर यांनी ‘चालू घडामोडी’ या विषयावर लेखमालिका लिहिली. अरुण टिकेकर हे त्या वेळी लोकसत्तेचे संपादक होते. तिनईकर यांची ही लेखमाला चांगलीच गाजली. तिनईकर हे एक उत्तम चित्रकार होते. सतारवादन व वक्तृत्वकलेत ते प्रवीण होते. आपली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा ते कधीही विसरले नाहीत. सतत समाजाभिमुख राहिले. शासनाकडून त्यांना अनेकदा अडचणी आणि त्रास सोसावा लागला. परंतु सामान्य माणसांनी त्यांच्यावर सतत प्रेम केले. त्यामुळे अर्थातच तिनईकर हे एक आगळेवेगळे प्रशासक म्हणून सदैव लक्षात राहतील. - प्रा.डॉ.विजय देव

शिल्पकार चरित्रकोश २६५