पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड़ टाकळकर, वसंत देगुजी दिले व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. भेजदरी, सुरेगाव, वराड, लासूर, डोळ्यासणे ही गावे हिरवीगार, झाली. छत्तीस हजार कि.मी. हेक्टरवरील चार हजार पाचशे कि.मी. लांबीची शास्त्रोक्त सलग समतल चरांच्या साहाय्याने पंधरा लाख लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. मांगी-तुंगीजवळच्या डोंगराला ‘वसंत हिल्स’ नाव देऊन लोकांनी वसंत टाकळकरांच्या कामाची पावती दिली. हिवरे बाजार या गावच्या पोपटराव पवारांना समतल चराची शास्त्रीय माहिती पटवून देणारे वसंतराव प्रसिद्धीपासून मात्र दूरच राहिले. काही आदिवासी गावांमध्ये त्यांना ‘पाण्याचा देव’ म्हणून संबोधत, हीच टाकळकरांच्या दृष्टीने खरी प्रसिद्धी आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यातील वर्‍हाड हे एक हजार चारशे लोकवस्तीचे आदिवासी गाव. २००२ सालच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईमुळे इथे लोकांना जगणे नकोसे झाले होते, बारा दिवसांनंतर पाण्याच्या टँकरची पाळी येई. या भागात टाकळकरांनी उन्हाळ्यात वीस हेक्टर भागात जल-मृदा संधारणाचे काम हाती घेतले. पुढच्या वर्षी झालेल्या पावसात इथल्या विहिरी तुडुंब भरलेल्या दिसल्या. हे विधायक चित्र केवळ टाकळकरांमुळे पाहणे शक्य झाले. वसंतरावांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सलग समपातळी चर खोदण्यामध्ये काटेकोरपणा आणला. वनखात्याच्या रोपवाटिकेत रोपांसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जात. रोपांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या इतस्तत: पडून राहत. त्या गोळा करून पुनर्नवी करणासाठी द्यायचे कामही त्यांनी जातीने पाहिले. महाराष्ट्रात एक कोटी हेक्टरपेक्षा अधिक जमीन पडीक आहे. त्यावर प्रयोग केला, तर तीन हजार सहाशे कोटी टन पाणी वाचवणे शक्य असल्याचे ते सांगतात. तज्ज्ञांनी टाकळकरांच्या या उपक्रमाला ‘टाकळकर पॅटर्न’ असे सार्थ नावही सुचवले. नद्यांच्या खालच्या भागातून पाणलोट क्षेत्र योजना करणे अशास्त्रीय आहे, पाणी अडवायला डोंगरमाथा ते पायथा असेच गेले पाहिजे, असे टाकळकर मानतात. अचूकतेचा आग्रह आणि प्रशिक्षणाची शिस्त यांचे धडे त्यांनी वनखात्याच्या ‘करड्या शिस्तीत’ त्यांच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांकडून गिरवून घेतले. या करड्या शिस्तीचा नेमका उपयोग टाकळकरांनी केला. दर्‍याखोर्‍यांतील, कानाकोपर्‍यांतील त्यांची कामे बोलू लागली आणि प्रसिद्धिमाध्यमांनी त्यांवर बातम्या दिल्या, पुस्तके लिहिली गेली. अनेक राज्यांतून प्रशिक्षणासाठी लोक येऊ लागले. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशने तर त्यांच्या या कामाला ‘मिशन’चे स्वरूप दिले. टाकळकरांच्या तंत्राला भारतभर मान्यता मिळाली. २००४मध्ये उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींबरोबर झालेल्या चर्चेत पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा मानून विकेंद्रित जलव्यवस्थापनाचा आग्रह टाकळकरांनी धरला. २००४ मध्ये टाकळकर सेवानिवृत्त झाले असले तरी राज्यभरातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलांना जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्यात ते व्यग्र आहेत. सध्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतून आपल्याकडील संचित नव्या पिढीकडे सुपूर्त करत आहेत. वसंतराव टाकळकर यांच्या या कामामुळे त्यांना केंद्र सरकारने २००५ मध्ये ‘इंदिरा प्रियदर्शिनी’ पुरस्कार दिला. पुणे विद्यापीठाच्या समर्थ भारत अभियानाचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे काम सुरू आहे. पुणे शहरातील तीन टेकड्यांवर सलग समतल चर तंत्राच्या साहाय्याने काम सुरू आहे. टाकळकर हे अ‍ॅपेक्स कमिटीचे सदस्य आहेत. याच माध्यमातून भारतातील पावसाचे पाणी साठविण्याच्या पुरातन पद्धती, तसेच ग्रामीण भागातील पावसाचे पाणी अडविणे, जिरवणे यांसंबधी ११० पानी तांत्रिक पुस्तिका तयार केली गेली असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होत आहे. - अनघा फासे

शिल्पकार चरित्रकोश २५९