पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड टाकळकर, वसंत देगुजी ट । टाकळकर, वसंत देगुजी वनसंरक्षक, भारतीय वनसेवा १ जून १९४४ वसंत देगुजी टाकळकर यांचा जन्म पुण्याजवळ ४५ किलोमीटरवर असणार्‍या टाकळवाडी (राजगुरुनगर, ता. खेड, पुणे) या छोट्याशा गावी झाला. वडील देगुजी टाकळकर आणि आई सीता यांच्या शेतकरी कुटुंबात वाढत असताना त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले. घरच्या शेतीमुळे तिकडेच त्यांचा विशेष ओढा होता. शेतकर्‍यांचे प्रश्न, समस्या अगदी जवळून अनुभवल्या असल्याकारणाने शेतकर्‍यांसाठी, समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, ही तळमळ लहानपणापासून होती. टाकळकर यांचे प्राथमिक शिक्षण राजगुरुनगर महात्मा गांधी विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते १९६६ मध्ये पुण्यात आले. त्यांनी कृषी महाविद्यालयातून कृषी विषयात पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांनी डेहराडून येथील असोसिएशन ऑफ इंडियन फॉरेस्ट महाविद्यालय येथून पदव्युत्तर पदविका घेतली. १९७८ मध्ये कायद्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. १९८९ मध्ये लॉस बॅनोस विद्यापीठ, फिलिपीन्स येथून ‘फॉरेस्ट फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट’ या विषयात प्रमाणपत्र मिळविले. टाकळकरांनी १९८२ मध्ये आयआयएम, अहमदाबाद येथून शेतकी विषयात प्रकल्प व्यवस्थापन शिक्षण घेतले. तसेच हैदराबाद येथील ‘एनआयआरडी’ येथून त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन (प्रॉजेक्ट प्लॅनिंग) आणि मूल्यांकन या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लोकसेवा आयोगामधून त्यांची प्रथम प्रयत्नात निवड झाली. वनसंरक्षक पदावर काम करताना टाकळकर यांनी सुरुवातीची २५ वर्षे नाशिक, चंद्रपूर, ठाणे येथे काढली. १९९० मध्ये त्यांची बदली सोलापूरसारख्या दुष्काळी भागात झाली. या जिल्ह्यात मुळात वनखात्याची जमीन कमी, त्यातून पावसाचे प्रमाणही अत्यल्प. या प्रतिकूल परिस्थितीमुळे टाकळकरांना आव्हान दिसले. त्यांना प्रा.भागवतराव धोंडे यांनी शोधलेल्या ‘कंटूर मार्कर’ या उपकरणाची आठवण झाली. सलग समपातळी चर ऊर्फ ‘कन्टिन्युअस कंटूर ट्रेंच’ या पद्धतीने काम केले तर सोलापुरातल्या उजाड माळरानांचे भवितव्य उजळून निघेल याची त्यांना खात्री वाटली. त्यांनी या तंत्राचा वापर आपल्या कार्यकक्षेतील असंख्य वनजमिनी व डोंगर टेकड्यांवर झाडे लावण्यासाठी केला. त्यांनी आपल्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांनाही हे तंत्र शिकविले. सोलापूर, अहमदनगर, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात लक्षावधी हेक्टरमधील वनक्षेत्रांत समपातळी रेषेवर चर खोदून त्यांनी असंख्य झाडे लावली. डोंगरमाथ्यापासून उतारापर्यंत माती आणि पाणी अडविण्यासाठी टाकळकरांनी ‘सलग समतल चर’ या तंत्राचा अवलंब केला. डोंगरावर समपातळीचे सलग चर खणले तर वाहणारे पाणी आणि त्याबरोबर येणारी माती थांबते. या चरांमध्ये झाडे वाढू शकतात. हे चर सलग आणि समपातळीतच घेणे आवश्यक असते. या शिल्पकार चरित्रकोश २५७