पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड चितळे, माधव आत्माराम १९६१ मध्ये पुण्याला पाणीपुरवठा करणारी पानशेत व खडकवासला ही धरणे फुटली. पुण्याचा पाणीपुरवठा बंद पडला. चितळे यांनी त्यांचे अभियांत्रिकीचे कौशल्य पणाला लावले. कंत्राटदारांना विश्वास देत त्यांना बरोबर घेऊन १२० दिवसांच्या आत त्यांनी पुण्याचा पाणीपुरवठा पूर्ववत केला. १९६४ ते १९६६ या काळात ते मुळा या मातीच्या धरणाच्या कामात गुंतले होते. या धरणाच्या पायातल्या खडकांत विवरे सापडली. त्यामुळे धरणाचा पाया नीट होत नव्हता. त्यासाठी लवचीक पायाची नवीन रचना करण्यात आली. त्यामध्ये चितळे यांचा सहभाग होता. चितळे पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी समितीचे दहा वर्षे सभासद होते. त्यांनी विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार केला. नाशिक येथील महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे ‘मेरी’ आणि ‘इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज ऑफ महाराष्ट्र’ या संस्थांची त्यांनी पुनर्रचना केली, अभ्यासक्रम बदललेले, सक्षम अभियंते घडविण्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र लँड डेव्हलपमेंट कॉर्पोेरेशन आणि डायरेक्टोरेट ऑफ इरिगेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, पुणे या संस्थांनाही त्यांचे मार्गदर्शन मिळाले. पाटबंधारे योजनांच्या व्यवस्थापनाला वाहिलेले ‘सिंचन’ हे त्रैमासिक १९८२ मध्ये त्यांनीच सुरू केले. महाराष्ट्र जल आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ‘निळी क्रांती’ या मराठी पुस्तकाचे ते लेखक आहेत. १९८४ मध्ये चितळे यांची नियुक्ती नद्यांवर बांधलेल्या धरण प्रकल्पाचे आयुक्त म्हणून झाली. या पदावर काम करताना त्यांनी फराक्का, बेटवा, बनसागर, सरदार सरोवर व नर्मदा या धरणांच्या कामाकडे लक्ष पुरवले. १९८५ मध्ये केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष व पदसिद्ध सचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली. जलसंपत्ती विकासविषयक ही देशातील सर्वोच्च संस्था आहे. १९८९ मध्ये भारत सरकारच्या जलसंपत्ती मंत्रालयाचे ते सचिव झाले. त्यांनी केंद्रीय जलधोरण तयार केले. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय सिंचन व निस्सारण आयोगाचे महासचिव म्हणून काम पाहिले. जगभरातल्या पाणी समस्यांचे अनुभव एकत्र करून त्यांनी ‘पाण्याची बचत’ हे पुस्तक संपादित केले. त्याचबरोबर त्यांनी ‘पाणी व जमीन यांची उत्पादकता’ या पुस्तकाचे संपादनही केले. जुलै २००५ मध्ये मुंबईत पावसाने कहर केला. त्या वेळी मिठी नदीच्या पुराने हाहाकार उडवला. कारण या नदीत अतिक्रमणे झाली होती. शासनाने डॉ.चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अशी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाय सुचवले. त्यांच्या बहुविध कामगिरीमुळे त्यांना विविध विद्यापीठांनी डॉक्टरेट प्रदान केली आहे. तसेच डॉयल शिल्पकार चरित्रकोश