पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

च । प्रशासन खंड चाफेकर, माधव लक्ष्मण कोयना प्रकल्पावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर भारत सरकारने त्यांची मुंबई येथील भारतीय नौसेनेच्या डॉकयार्डच्या विस्तारासाठी अभियांत्रिकी प्रशासक (इंजिनिअरिंग अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) म्हणून नेमणूक केली. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने भारतीय नाविक दलाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई येथे डॉकयार्ड व तदनुषंगिक सुविधांच्या निर्मितीचे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे आव्हान हाती घेण्याचे ठरविले. या कामातील पाईल्सवर आधारित डेक फ्लोअरचे अवघड काम एका विदेशी कंपनीला दिलेले होते. त्यात गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊन १९५६ च्या दरम्यान ते थांबले. भारत सरकारने या रेंगाळलेल्या कामाला गती देण्यासाठी मुंबई राज्यातील बांधकाम खात्यातील एका निष्णात निवृत्त मुख्य अभियंत्याची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आणि ओघानेच ती अवघड जबाबदारी स्वीकारण्याचा मान चाफेकर यांना मिळाला. चाफेकरांनी स्वत:च्या अभियांत्रिकी कौशल्याने आणि कल्पकतेने कामाला गती दिली. चाफेकरांनी दीड वर्षाच्या कालावधीनंतर राजीनामा दिल्यावर इंडियन नेव्हीने सदरील काम खात्यामार्फत (डिपार्टमेंटली एंगेज्ड लेबर - डी.इ.एल.) हाती घेऊन तडीस नेले. दुर्दैवाने नेव्हल डॉकयार्ड या क्षेत्रातील चाफेकरांची ही अलौकिक कामगिरी दुर्दैवाने पडद्याआड राहिली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ‘राज्य सिंचन आयोगा’वर चाफेकरांची शासनाने सन्माननीय सदस्य म्हणून नेमणूक केलेली होती. राज्याच्या सिंचन विकासाचा पाया याच आयोगाने रचला आहे. आयोगाने केलेल्या बहुतांशी शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या. चाफेकर पुण्यामध्ये आल्यानंतर सहा वर्षे पुणे म.न.पा. मध्ये नगरसेवक होते. तसेच एक निष्णात अभियंंता म्हणून अनेक वर्षे ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरअर्स’ या अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्येष्ठ अशा संस्थेत त्यांनी सतत सक्रिय योगदान दिले. राज्य पातळीवर या संस्थेचे अध्यपदही त्यांनी भूषविले आहे. जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांना पाणी या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा देणारे चाफेकरच आहेत. चितळे यांनी पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९५५ साली पुणे विद्यापीठात अग्रक्रमाने बी.ई.(स्थापत्य) ही पदवी मिळवली. राज्याच्या (एम.पी.एस.सी.) व भारतीय संघराज्याच्या (यू.पी.एस.सी.) या दोन्ही स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण झाल्यावर चितळे यांच्यापुढे शासकीय सेवेचा कोणता पर्याय निवडावा याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. चितळे यांनी विचारले असता चाफेकरांनी त्यांना सल्ला दिला की, “आर्थिक लाभ, मर्यादित क्षेत्र या दृष्टीने केंद्र सरकारची नोकरी बरी वाटते; पण समाजाशी निगडित अशा पायाभूत क्षेत्रात काम शिल्पकार चरित्रकोश २३७