पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| च | चाफेकर, माधव लक्ष्मण प्रशासन खंड १९९५ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही काका चव्हाण प्रचंड सक्रिय आहेत. पुण्याजवळ भोसरी हे काकांचे वास्तव्याचे ठिकाण आहे; पण नाशिक परिसर हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. घरगुती औषध पद्धतीतल्या शिवांबू, आवळा लागवड आणि गुळवेल, आजपर्यंत दुर्लक्षित, अशा औषधी वनस्पतींचा प्रचार करण्याचे कार्य सध्या ते करत आहेत. - सुधाकर कुलकर्णी

चाफेकर, माधव लक्ष्मण भारतीय अभियांत्रीकी सेवा मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते ७ फेब्रुवारी १८९९ - ७ सप्टेंबर १९८७ माधव लक्ष्मण चाफेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वेरणेश्वर या ठिकाणी झाला. वडील कुलाबा वेधशाळेत कारकून होते. १९०२ साली त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेरणेश्वर व त्यानंतर पुढचे शिक्षण धुळे व पुणे येथे झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी पुण्यातील विश्रामबाग वाड्यातील सरकारी शाळेतून ते मॅट्रिक झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी फर्गसन महाविद्यालयात इंटर सायन्सचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक वर्षाच्या ‘मिस्त्री’ या प्रशिक्षणार्थी (अ‍ॅप्रेंटिस) अभ्यासक्रमासाठी निवड झाली. पुढे त्यांना तेथेच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि १९२२ साली बी.ई. सिव्हिल ही पदवी मिळाली. ते परिक्षेत सर्वप्रथम आले आणि त्या वेळच्या नियमाप्रमाणे त्यांना भारतीय अभियांत्रिकी सेवा (इंडियन सर्व्हिस ऑफ इंजिनिअरिंग) या सेवेमध्ये थेट ‘सहायक कार्यकारी अभियंता’ या पदावर घेण्यात आले. १९२४ च्या सुमारास त्यांची पुण्यातील शनिवारवाड्याजवळील बांधकामावर नेमणूक झाली. नंतर निरा कालव्याच्या बांधकामावर त्यांना नेमण्यात आले. त्याकाळातील समाजापेक्षा चाफेकरांची विचारसरणी एका पावलाने पुढे होती. हुंडा घेणे प्रतिष्ठेचे अशी समाजात धारणा असली, तरी त्यांनी लग्नात हुंडा घेतला नाही. ब्रिटिश राजवटीत निरा कालव्यावर काम करीत असतानासुद्धा ते खादीचे कपडे वापरत असत. माळशिरस हे त्यांचे मुख्यालय होेते. शासकीय सेवेत असतानाच त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील मास्टर्स डीग्री (एम.सी.ई.) ही पदवी संपादन केली. १९३० च्या दरम्यान त्यांची सिंध येथे नेमणूक झाली. १९३५ साली सिंध प्रांत हा ‘मुंबई प्रेसिडेन्सी’ मधून वेगळा झाला. सिंध प्रांतातील मिरपूरखास या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून ते दोन वर्षे कार्यरत होते. १९३४ साली ते लारखानाला गेले व १९३७ मध्ये ते कराचीस उपसचिव (अधीक्षक अभियंता) म्हणून रुजू झाले. नंतर पाकिस्तानातील हैद्राबाद जवळील सिंधू नदीवर ‘ट्विन बॅरेज’ प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी पार पाडले. १५ऑगस्ट१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला व ते सप्टेंबर१९४७मध्ये मुंबई राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाले. फाळणीनंतर पाकिस्तान सरकारने हा प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केला. एक वर्षाच्या कालावधीनंतर त्यांच्यावर मुख्य अभियंता म्हणून एका नावीन्यपूर्ण व गुंतागुंतीच्या कोयना या भुयारी जलविद्युत प्रकल्पाचा आराखडा बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. कोयना अवजल प्रकल्पाचा लेआउट हा त्यांचा या क्षेत्रातील प्रतिभेचा आविष्कारच घडवितो. याच प्रकल्पाच्या बांधकामासाठी त्यांनी पुढे मुख्य अभियंता या पदाचे कार्यालय मुंबईहून हलवून कोयनानगर या प्रकल्पस्थळी नेले.

२३६ शिल्पकार चरित्रकोश