पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड गोळे, पद्माकर विश्वनाथ इतिहासात पहिल्यांदाच घडत होती. गोळे कर्तव्यदक्ष व प्रखर राष्ट्रभक्त आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताची सैनिक व्यवस्था सबल करण्यासाठी इतर शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांनाही स्वयंसेवक म्हणून काम करता येत असे. गोळे रेल्वेच्या टेरिटोरियल आर्मीत स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले आणि त्यांना त्यांचे कर्तृत्व दाखवून देण्याची संधीही चालून आली. कारण त्याच दरम्यान १९७१च्या लढाई नंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. यावेळी बंडखोरांनी रेल्वेची अतिशय नासधूस केली होती. तेथील रेल्वे रुळ व रेल्वे पूल उभारण्यात आणि रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यात त्यांनी सहभाग घेतला. बांगलादेशवाद्यांचा सशस्त्र हल्ला होत असल्याने रेल्वे मार्ग उखडले जात होते. पकडले जाणार्‍या बांगलादेशवाद्यांना रेल्वेने आग्य्राला आणून सोडण्याचे महत्त्वपूर्ण काम गोळे यांच्या नेतृत्वाखालील गटाने यशस्वीरीत्या पार पाडले. रेल्वे मार्ग उखडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. हे रेल्वेमार्ग व्यवस्थित करण्याचे काम गोळेंकडे सोपविण्यात आले. त्यासाठी त्यांना फक्त १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. हे काम चालू असताना दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरूंगाचे स्फोट होऊन त्यांचे सहकारी जखमीही होत होते पण गोळे मागे हटले नाहीत आणि त्यांनी हे काम अवघ्या १० दिवसात पूर्ण केले. बंगाली जनतेला आपापल्या गावी परत जाण्यासाठी व सैन्याला जलद हालचाली करण्यासाठी या रेल्वेमार्गाचा मोठा उपयोग झाला. रेल्वे सेवेत असताना सैन्याच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने ‘अतिविशिष्ट सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

तसेच त्यांची एअर इंडियाच्या संचालकपदी  नियुक्ती करून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. ते एअर इंडियात येण्याअगोदर या संस्थेची स्थिती अतिशय वाईट झालेली होती. वैमानिक आणि कामगार संघटना मनमानी करत होत्या. अवास्तव मागण्या केल्या जात होत्या आणि त्यामुळे एअर इंडियाची व्यवस्थापन समिती प्रचंड तणावात होती. 

अशा मागण्यांसाठीच सर्व वैमानिकांनी बेमुदत संप पुकारला. विमान वाहतूक विस्कळीत झाली. वैमानिकांच्या अवास्तव मागण्या मान्य करणे एअर इंडियाला कधीच शक्य नव्हते. अशा परिस्थितीत गोळेंची संचालकपदी झालेली निवड ही एअर इंडियासाठी संजीवनीच ठरली. गोळेंनी संप केलेल्या सर्व वैमानिकांना निलंबित केले. नवीन वैमानिकांची भरती सुरू केली. याच दरम्यान इंग्लंडमध्ये कडक अशा मार्गारेट थॅचर यांचे सरकार आले होते. त्यांच्या प्रशासनाने एअर इंडियाच्या लंडनमधील कर्मचार्‍यांना बंद पुकारूच दिला नाही. त्यामुळे वैमानिकांचा हा बंद सपशेल फसला. त्यांच्या मागण्या मान्य करणे सोडाच उलट गोळेंनी व्यवस्थापनाच्याच अटी संघटनेला मान्य करायला लावल्या. गोळे हे १९७८ साली एअर इंडियातून निवृत्त झाले व पुण्यातच कायमचे स्थायिक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रदीप वाघ या शिक्षणतज्ज्ञाबरोबर उद्योजक विकास संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रात काम केले. आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यात यावे यासाठी ते सदैव आग्रही राहिले. २००० साली महाराष्ट्र शासनाने त्यांची ही मागणी मान्य केली व शिक्षणात तांत्रिक शिक्षणाचा अंतर्भाव केला. सध्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी गोळे यांचा पुण्यात मुक्काम आहे. - दत्ता कानवटे

शिल्पकार चरित्रकोश २३३