पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चव्हाण, कारभारी काशीनाथ प्रशासन खंड चव्हाण, कारभारी काशिनाथ संचालक, सामाजिक वनीकरण विभाग, सुबाभूळ, सामाजिक वनीकरणाचे प्रणेते २० जुलै १९३७ कारभारी काशिनाथ चव्हाण ऊर्फ काका चव्हाण यांचा जन्म मालेगाव तालुक्यातील खडकी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव शारदाबाई होते. वडिलांची फक्त विहिरीवर अवलंबून असलेली एक एकर शेती होती. परिणामी, चरितार्थासाठी या कुटुंबाला रोजंदारीवर शेतमजूर म्हणून काम करणे अपरिहार्य होते. कारभारी यांच्या घरातले सगळेच अशिक्षित होते. वडिलांनी कारभारींना चवथीपर्यंत असलेल्या स्थानिक शाळेत दाखल केले. पुढील शिक्षणासाठी ते शाळेसाठी मालेगावात आले. काकांची आर्थिक क्षमता नसल्याने मालेगावच्या शिक्षकांनी त्यांची फी भरून वसतिगृहाच्या दैनंदिन कामाच्या मोबदल्यात विमुक्त मुलांच्या वसतिगृहात राहण्याची सोय केली. हे वसतिगृह शाळेपासून चार किलोमीटर अंतरावर असल्याने काकांना रोज आठ किलोमीटर अंतर चालावे लागत असे. प्रतिकूल परिस्थितीतही काका जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. मुळातच संशोधनाची आवड असल्याने काकांनी रोजच्या पायी चालण्याचा उपयोग निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी केला. या शोधवृत्तीचा फायदा त्यांना शासकीय वनसेवेत झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पाचशे रुपये कर्ज काढून काकांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. कृषी विषयात बी. एस्सी. पदवी घेतल्यानंतर पदवीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणून चव्हाणांनी भाऊसाहेब हिरे यांच्या शेतकी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. या काळात डेहराडूनच्या संस्थेत त्यांची निवड होऊन ते १९६१ मध्ये वनसेवेत रुजू झाले. चव्हाणांनी अनेक छोटे पण सर्वांगांनी समाजोपयोगी प्रकल्प कार्यान्वित केले. त्यांची निरीक्षण वृत्ती आणि त्यावर आधारित संशोधनाची आवड यांमुळे त्यांनी अनेक उपकरणांचा विकास केला. ग्रामीण भागात आजही जळणाचे इंधन म्हणून बेकायदेशीर जंगलतोड झाल्याने वनांचा र्‍हास होतो. यावर ‘वनज्योती शेगडी’ हा उत्तम पर्याय चव्हाणांनी विकसित केला. एका पत्र्याच्या पिंपात ही शेगडी बनवली जाते. या शेगडीच्या मध्यावर एक पी.व्ही. सी. पाइप उभा केला जातो. पाइपाभोवती पालापाचोळा घट्ट दाबून बसवला जातो. नंतर पाईप काढून शेगडीच्या खाली असलेल्या छिद्रात पेटते लाकूड घालून शेगडी प्रज्वलित केली जाते. या शेगडीवर बरेच तास स्वयंपाक करूनही आतला पालापाचोळा बर्‍याच प्रमाणात शिल्लक राहतो. चंद्रपूर जिल्ह्यात सागाच्या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पारंपरिक पद्धतीने ही लागवड करणे हे अतिशय त्रासदायक काम असते. काका चव्हाणांची १९७७ मध्ये चंद्रपूरला नियुक्ती झाली आणि त्यांनी हे काम अगदी सोपे करण्याचा उपाय शोधून काढला. २३४ शिल्पकार चरित्रकोश