पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग प्रशासन खंड गोडबोले, माधव दत्तात्रेय प्रकल्प यांमधून आजवर प्रकाशित झाले आहेत. वन आणि जैववैविध्याच्या संवर्धनासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात महत्त्वपूर्ण संशोधन केले. याबाबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सल्लागार म्हणून ते ओळखले जातात. डिसेंबर २००७ मध्ये जपानच्या ‘जॅपनीज बँक फॉर इंटरनॅशनल ऑपरेशन’ या बँकेने ओरिसा सरकारला सहाशे पन्नास कोटी वनव्यवस्थापनासाठी मदत दिली. या प्रकल्पाबाबत ओरिसा सरकारला सल्ला देण्यासाठी, तसेच ओरिसा सरकार हा प्रकल्प कशा प्रकारे राबवत आहे याचे निरीक्षण करणार्‍या जपानच्या ‘निप्पोन कोईका’ या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेचे सल्लागार म्हणून गोगटे यांची नेमणूक झाली. या प्रकल्पासाठी त्यांनी तीन वर्षे काम केले. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. - संध्या लिमये

गोडबोले, माधव दत्तात्रेय केंद्रीय गृहसचिव, अर्थतज्ज्ञ १५ ऑगस्ट १९३६ आजच्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉ.माधव दत्तात्रेय गोडबोले यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय बळवंत गोडबोले हे न्यायाधीश होते. साहजिकच, दर दोन ते तीन वर्षांनी त्यांची बदली होत असे. त्यामुळे गोडबोले यांचे शालेय शिक्षण कोरेगाव-दहिवडी-संगमनेर-जळगाव अशा विविध गावांत झाले. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात दोन वर्ष व्यतीत केल्यानंतर गोडबोले पुढे मुंबईला गेले आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून १९५६मध्ये ते बी.ए. झाले. पुढे अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. पदवी धारण केली. पदव्युत्तर शिक्षणानंतर गोडबोले यांनी मुंबई विद्यापीठातच प्रा.डॉ.पी.आर.ब्रह्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेटसाठी नावनोंदणी करून संशोधनास प्रारंभ केला. परंतु त्याच दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची निवड झाल्याने १९५९मध्ये गोडबोले यांना प्रथम नवी दिल्ली व पुढे मसुरी येथे जावे लागले आणि डॉक्टरेटच्या कामात खंड पडला. पुढे त्यानंतर तब्बल सतरा वर्षांनी म्हणजे १९७६मध्ये डॉ.संदरेसा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘औद्योगिक अर्थकारण’ या विषयावरील प्रबंधाचे काम गोडबोले यांनी पूर्ण केले. १९७८मध्ये डॉक्टरेटची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. मसुरी येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोडबोले यांची सातारा येथे साहाय्यक जिल्हाधिकारी पदावर १९५९मध्ये पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर १९६१ सालच्या मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्याचे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून गोडबोले यांनी सूत्रे घेतली. त्यांच्या कार्यकालाची ती तीन-साडेतीन वर्षे बव्हंशी अवर्षणाची राहिल्याने जिल्ह्यात ठायी ठायी दुष्काळी कामे हाती घेण्याकडेच त्यांचा मुख्य भर राहिला. १९६४ सालच्या जून महिन्यात बढती मिळून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने गोडबोले यांनी पदभार सांभाळला. लोकनियुक्त प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या दरम्यानच्या खडाजंगीबाबत नाशिक जिल्हा परिषद त्या काळी गाजत होती. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर मात्र गोडबोले यांनी प्रगल्भतेने, पदाच्या प्रतिष्ठेचा बाऊ न करता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दरम्यान विविध पातळ्यांवर सुसंवाद आणि सामंजस्य प्रस्थापित होण्यासाठी पावले उचलली. नाशिक जिल्हा तेंव्हा टंचाईग्रस्त असल्याने गोडबोले यांनी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले. कालव्यांची बांधबंदिस्ती व पाझर तलावांच्या कामाला जोरदार चालना देण्यात आली. राज्यभर सर्वत्र या कामाची प्रशंसा झाली.

शिल्पकार चरित्रकोश २२९