पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोगटे, माधव गणेश प्रशासन खंड पक्षीवैविध्य, स्थानिक कोरकू आदिवासींची जीवनपद्धती या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा आराखडा तयार केला. तेथे पर्यटनासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधांची उभारणी केली. मेळघाटात पर्यटक फक्त वाघ पाहायला जायचे. परंतु गोगटे यांनी आपल्या प्रयत्नांतून मेळघाटातील जैववैविध्याकडे पर्यटकांचे लक्ष वेधले. या महत्त्वपूर्ण योगदानामुळे माधव गोगटे यांना १९९२-१९९३ ‘मेरिटोरियस सर्व्हिस फॉर टायगर कॉन्झर्व्हेशन’ हा पुरस्कार देऊन भारत सरकारकडून गौरवण्यात आले. १९९१-१९९५ ‘वनसंरक्षक संशोधन’ या पदावर पुणे येथे कार्यरत असताना गोगटे यांनी ‘इकॉलॉजिकल ऑडिट ऑफ टीक प्लँटेशन’ या विषयावर शास्त्रोक्त संशोधन केले. या संशोधनाबद्दल त्यांना वनसंशोधन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणार्‍या ब्रँडिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डेहराडूनच्या वनअनुसंधान केंद्राद्वारे प्रकाशित होणार्‍या ‘इंडियन फॉरेस्टर’ या मासिकाकडून दिला जातो. या काळात सागाची लागवड करून त्याचे बॉण्ड विकणार्‍या कंपन्यांचे जाळे महाराष्ट्रभर निर्माण झाले होते. याची सत्यता, त्यातून होणारा नफा यांबाबतही गोगटे यांनी संशोधन केले. या कामाबद्दल त्यांना १९९४ मध्ये ‘इंडियन फॉरेस्टर’ या मासिकाकडून चतुर्वेदी पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. ‘मुख्य वनसंरक्षक वन्यजीव’ या पदावर १९९७ ते २००० या काळात गोगटे नागपूर येथे कार्यरत होते. यावेळी महाराष्ट्रातील सर्व अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांच्या व्यवस्थापनाचे महत्त्वाचे काम गोगटे यांच्याकडे होते. व्याघ्रप्रकल्पातील माधव गोगटे यांच्या महत्त्वपूर्ण कामाबद्दल त्यांना ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘कॅट स्पेशालिस्ट ग्रूप’ चे मानद सभासदत्व १९९२ मध्ये बहाल करण्यात आले. ‘संचालक सामाजिक वनीकरण’ या पदावर ते २००० ते २००२ पुणे येथे कार्यरत होते. नोव्हेंबर २००३ मध्ये माधव गोगटे मुख्य वनसंरक्षक वन्यजीव या पदावरून नागपूर येथून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर गोगटे यांनी वनसंवर्धन आणि संशोधन या क्षेत्राबद्दल वृत्तपत्रांमधून लिखाण सुरू केले. ‘अ‍ॅग्रोवन’ या वृत्तपत्रामध्ये त्यांनी वृक्षांची ओळख करून देणारी ‘अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री’ या विषयावरील लेखमालिका वर्षभर चालवली. यामध्ये दर आठवड्याला एका वृक्षप्रकाराची लागवड, संगोपन, उपयोग, त्यातून मिळणारा आर्थिक नफा यांबाबतच्या शास्त्रीय माहितीचे लेखन केले जात असे. २००४ ते २००७ या कालावधीत ते ‘सेवानिवृत्त वनकर्मचारी संघटनेचे’ अध्यक्ष होते. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुणे येथे ‘शहरातील वनीकरण’ या विषयावर विविध उपक्रमांचे आयोजन केले. सामान्य माणसांमध्ये वनांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी सातत्याने लिखाण केले. वनांबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले. त्यांचे वनव्यवस्थापन आणि संशोधन या विषयावरील तीनशेहून अधिक लेख वृत्तपत्रे, मासिके, संशोधन २२८ शिल्पकार चरित्रकोश