पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड गोगटे, माधव गणेश यांनीही लहानपणापासून पक्षी-प्राणी हाताळले होते. वनांबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल लहानपणापासूनच त्यांना प्रेम होते. १९६४ मध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या वनविभागाच्या परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले. १९६६ मध्ये वनसेवा ही अखिल भारतीय सेवा करण्यात आली. १९६८ मध्ये गोगटे यांनी परीक्षा दिली आणि त्यांची भारतीय वनसेवेमध्ये निवड झाली आणि त्यांची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली. १९६८-६९ या वर्षी ते परिविक्षाधीन अधिकारी म्हणून मेळघाटातील अत्यंत निबिड अशा कोट्टू या ठिकाणी कार्यरत होते. मेळघाटातील जैववैविध्य या काळात त्यांनी अभ्यासले. या अनुभवाचा त्यांना पुढील काळात खूप उपयोग झाला. वने म्हणजे फक्त वृक्षच नाहीत तर वनांसोबत वाढणार्‍या इतर जीवसृष्टीचेदेखील आपण जतन केले पाहिजे, तरच आपण खर्‍या अर्थाने जैववैविध्य जोपासू शकतो हे तत्त्व गोगटे यांनी वन विभागातील आपल्या कार्यकाळात कसोशीने पाळले.

१९७२मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी माधव गोगटे यवतमाळमध्ये काम करत होते. या काळात त्यांच्या असे लक्षात आले की, दुष्काळाचा पहिला परिणाम सगळ्यांत आधी वनांतील चार्‍यावर होतो. चार्‍याअभावी दुष्काळाच्या काळात शेतकर्‍यांना आपल्या गायी-गुरे विकावी लागतात, कसायाच्या हवाली करतात. त्यांना त्यामुळेच निसर्गत:च उपलब्ध होणार्‍या गवती कुरणांचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. या दुष्काळाने त्यांचा वनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी ‘गवती कुरणांचे व्यवस्थापन’ या विषयावर सखोल अभ्यास केला. गवत नैसर्गिकरित्याच वाढू देणे, बी आल्यावरच त्यांची कापणी करणे यांमुळे चांगल्या प्रतीचे गवत नैसर्गिकरित्याच निर्माण होऊ शकते. अशा गवताचे पुनरुत्पादनाच्या दृष्टीने संवर्धन केल्यास आपण दुष्काळातदेखील टिकून राहू शकतो हे गोगटे यांनी संशोधनाने सिद्ध केले. त्याचबरोबर साठवणुकीच्या गवताचे आगीपासून संरक्षण करणे, अतिरिक्त चराईवर नियंत्रण मिळवणे ही कामेदेखील त्यांनी केली. 

१९८० ते १९८४ या कालवधीत गोगटे डेहराडून येथील वन अनुसंधान केंद्रात वानिकिशास्त्राचे (सिल्विकल्चर) संशोधक म्हणून कार्यरत होते. या संशोधनाचा त्यांना नंतरच्या काळात मेळघाट व्याघ्रप्रकल्पात काम करताना खूप उपयोग झाला. गवती कुरण व्यवस्थापनाच्या गोगटे यांच्या कामामुळेच १९८६-८७ च्या दुष्काळामध्ये वनविभागाकडून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात चारा वनविभागाकडून उपलब्ध करून देण्यात आला. गोगटे यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारने ‘नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून ‘नाशिकमधील गवती कुरणांचे व्यवस्थापन : एक यशोगाथा’ (ग्रीनिंग ऑफ ग्रास लँड इन नाशिक : अ सक्सेस स्टोरी) या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी गोगटे नाशिक येथे कार्यरत होते. योगायोग म्हणजे त्याच वेळी त्यांचे सहकारी कारभारी काशिनाथ चव्हाण (काका चव्हाण या नावाने परिचित) यांचा नाशिक येथील सामाजिक वनीकरण विभागात चराऊ-बंदी, कुर्‍हाड-बंदी हा उपक्रम सुरू होता. १९८७ ते १९९१ या काळात गोगटे यांची नियुक्ती संचालक व्याघ्रप्रकल्प, मेळघाट या पदावर करण्यात आली. याकाळात त्यांनी तेथील जैववैविध्य या विषयावर अभ्यास केला. मेळघाटाच्या व्याघ्रप्रकल्पाकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यापूर्वी पाहिले गेले नव्हते. गोगटे यांनी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या पर्यटन व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण काम केले. मेळघाटातील वनस्पतींच्या प्रजाती, शिल्पकार चरित्रकोश २२७