पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोखले, शरच्चंद्र दामोदर प्रशासन खंड रुजविली. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर फिरल्याने गोखले यांना एक वास्तव दृष्टिकोन मिळाला. याच काळात गोखले यांनी त्या खात्याचे ‘समाजसेवा’ नावाचे मासिक सुरू केले. या मुलांसाठीच्या कायद्यात बदल होण्यासाठी चळवळ करावी असा आग्रह गोखले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी धरला. त्यावेळच्या चिंतनातून गोखले यांनी ‘नावडती मुले’ हे आपले दुसरे पुस्तक लिहिले. त्याला महाराष्ट्र शासनाचा व इतर मिळून पाच पुरस्कार प्राप्त झाले. पाठ्यपुस्तक म्हणून मान्यताही मिळाली. सर्व महाराष्ट्रातून या विषयावर बोलण्यासाठी गोखले यांना निमंत्रणे येत. मुलांच्या या कामात रमलेले असताना अचानक सरकारी खलिता आला. मुंबईला भिक्षा प्रतिबंधनाचे व कुष्ठ निवारण्याचे काम सुरू करण्यासाठी शासनाच्या चेंबूर येथील संस्थेच्या प्रमुखपदी म्हणून गोखले यांची बढतीवर बदली झाली होती. त्यानुसार चेंबूरला कुष्ठरोग्यांच्या संस्थेत गोखले रहावयास गेले. तेथील अनुभव फारच वेगळे होते. गोखले पत्नी व मुलांना घेऊन कुष्ठधामात रहायला गेले हे त्यांच्या सासर्‍यांनाही आवडले नाही. पण मोठ्या निष्ठेने व निर्धाराने गोखले यांनी तेथे काम केले. दोनच वर्षात त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) शिष्यवृत्ती मिळाली आणि इंग्लंड, नॉर्वे, स्कॅन्डिनेव्हिएन देश व इस्त्रायल येथे वर्षभर राहून त्यांनी अभ्यास केला. सर्वोत्तम परदेशी विद्यार्थी असा त्यांचा गौरव झाला. बी.बी.सी.वर त्यांची मुलाखत झाली. परदेशातून परत आल्यावर बढती मिळून साहाय्यक संचालक म्हणून त्यांची पुण्यास बदली झाली. मोठा अधिकार मिळाला पण काम पुष्कळसे कागदी असे. सरकारी बंधनांची जोखडबंदी त्यांना बोचू लागली होतीच. त्यामुळे भारतीय समाजकल्याण संस्था व आंतरराष्ट्रीय समाज विकास महामंडळ या संस्थांच्या आशिया व पॅसिफिक विभागाचा प्रमुख म्हणून त्यांची निवड झाल्याबरोबर गोखले यांनी सरकारी नोकरी सोडायचे ठरविले. तेथे काम करीत असतांना त्या क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यातून १९७५ मध्ये ते आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये प्रशासक झाले. सर्व देशांत राष्ट्रीय समाजकल्याण महामंडळे स्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या दृष्टीने बांगलादेश, श्रीलंका, इराण, व्हिएतनाम अशा अनेक देशातून त्यांना कार्य करता आले. काही जागतिक परिषदा संघटित कराव्या लागल्या. जगातील सर्व खंडांतून आणि प्रमुख देशांतून जाण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. महामंडळाचे काम स्थिर झाले आहे असे लक्षात येताच १९८८ मध्ये त्यांनी त्या संस्थेचा राजीनामा दिला व पुढच्या काळात कोणतीही नोकरी न करता आपल्या आवडीने काम करावे असा निर्णय त्यांनी घेतला. आंतरराष्ट्रीय वयोवर्धन संस्थेकडून आलेले निमंत्रण स्वीकारून डॉ.गोखले यांनी तिचे अध्यक्षपद स्वीकारले. त्या कामात सार्‍या जगातील वयोवर्धन संस्थांचे काम पाहण्याची वा तेथे नव्याने काम सुरू करण्याची संधी होते. दक्षिण आफ्रिकेतील पहिले कार्यालय त्यांनी सुरू केले. चीनमध्येही त्या संदर्भात बोलणी केली. भारतात पहिली जागतिक वयोवर्धन परिषद त्यांनी मुंबई व पुण्यामध्ये घेतली. याच सुमारास इंटरनॅशनल लेप्रसी युनियन स्थापन करण्याचे ठरले व अध्यक्ष म्हणून डॉ.गोखले यांची निवड झाली. त्याच काळात ते गांधी मेमोरियल लेप्रसी फौंडेशनचे अध्यक्ष झाले. मुंबईत काम करीत असतांना डॉ. गोखले यांच्या ध्यानात आले की अपंग कुष्ठरुग्ण यांच्या मुलांचा प्रतिपाळ कोणीच करीत नाही. त्यासाठी झालेल्या विचारमंथनातून कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम (कास्प) या संस्थेचा जन्म झाला. दोन मुलांपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता देशातील बारा राज्यात राबविला जात असून त्यामार्फत सुमारे साठ हजार मुलांच्या प्रतिपालनाची जबाबदारी घेण्यात आली आहे. जयंतराव टिळक यांच्या सूचनेवरून गोखले यांनी केसरीचे संपादकपद स्वीकारण्याचे ठरविले आणि २२४ शिल्पकार चरित्रकोश