पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गायकवाड, व्यंकट विश्वनाथ प्रशासन खंड कृष्णा खोरे विकास महामंडळात अधीक्षक अभियंता म्हणून त्यांची पुण्याला बदली झाली. पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात असते. ते पाणी धरणात अडवून त्याचे पूर्वेकडील सखल भागात कालव्याचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन व्यंकटरावांनी केले. त्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य पणाला लावले. डिंबे धरणाचे रखडलेले काम पूर्ण करून येडेगाव तळ्यात पाणी सोडले. या त्यांच्या प्रशासकीय कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांना ब्रिज असोसिएशन ऑफ इंडियाचा पुरस्कारही मिळाला. कृष्णा खोरे विकास महामंडळात असताना त्यांनी सीना-भीमा या दोन नद्यांना जोडणार्‍या कालव्याचे काम केले. या नद्या जोडण्यासाठी २० कि.मी. लांबीचा बोगदा तयार करण्याची कल्पना त्यांनी मांडली, त्या वेळी अनेकांनी त्यांची टर उडविली. पण हा २० कि.मी. लांबीचा आशियातील सर्वांत लांब बोगदा तयार करून सीना आणि भीमा नद्या जोडण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवला. आज राष्ट्रीय पातळीवर नद्याजोड प्रकल्पांची चर्चा अजून सुरू आहे. परंतु १५-१६ वर्षांपूर्वीच व्यंकटरावांनी ते करून दाखविले आहे. दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातली वर्षातले दहा महिने कोरडी असणारी सीना नदी बारमाही पाण्याने भरलेली दिसते. मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. सन २००० मध्ये महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या कोयना प्रकल्पावर त्यांची नियुक्ती झाली. भूकंपग्रस्त असलेल्या कोयना धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रश्न अनेक दिवस रेंगाळला होता. कारण त्यासाठी धरणालगत सुरुंग घ्यावे लागणार होते. कुणी अधिकारी हे धाडस करीत नव्हते. परंतु व्यंकटरावांनी ते धाडस दाखवून मजबुतीकरणाचे काम यशस्वी केले. त्याचबरोबर त्यांनी मांजरा नदीवर असेच सात बांध घालून वाहून जाणारे पाणी अडविले आहे. पुढे व्यंकट गायकवाड गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक झाले. या वेळी त्यांनी मराठवाड्यातील अनेक रेंगाळलेल्या प्रकल्पांना गती दिली. विशेषत: गोदावरी नदीवर जायकवाडी धरणाच्या खाली नदीत जमा होणारे पावसाचे पाणी वाहून आंध्रप्रदेशात जात होते. ते पाणी अडविण्यासाठी गोदावरीवर अकरा ठिकाणी बांध घालून ते पाणी अडविण्याच्या खास योजनेवर व्यंकटरावांनी अतिशय मेहनत घेतली. त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी त्यांच्या कार्यालयातच झाली. पुढे त्यांची मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवपदी नेमणूक झाली, तरी गोदावरीवरील अकरा बंधारे त्यांनी पूर्ण करून घेतले. त्या अकरा बंधार्‍यांमुळे गोदावरीच्या ४२० कि.मी.च्या पात्रात बारमाही पाणी साठून राहिले आहे. त्यांच्या हातून घडलेले हे आणखी एक ऐतिहासिक कार्य आहे. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी जलसंपदा खात्यात जे काही निर्णय घेतले, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असताना त्यांच्या असे लक्षात आले होते, की या खात्यातल्या अधिकार्‍यांच्या पदोन्नत्या अनेक वर्षे रखडल्या होत्या. रिक्त झालेल्या जागा भरल्या जात नव्हत्या. त्यामुळे विकास कामांना खीळ बसत होती. त्यांनी पदोन्नत्यांचे आणि बदल्यांचे प्रश्न मार्गी लावून विकासाला गती प्राप्त करून दिली. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले २१२ शिल्पकार चरित्रकोश