पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र । प्रशासन खंड गायकवाड, व्यंकट विश्वनाथ मंडळ, औरंगाबाद येथे आरेखन (डिझाइन) विभागात रुजू झाले. दरम्यानच्या काळात एम.पी.एस.सी.चा अभ्यासही त्यांनी चालू ठेवला. १९७४मध्ये ते एम.पी.एस.सी. उत्तीर्ण झाले आणि सहायक अभियंता-श्रेणी-१ म्हणून त्यांची निवड झाली. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की त्याच वर्षी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी शून्याधारित अर्थसंकल्प (झीरो बजेट) जाहीर केला होता. पुढे त्यातून मार्ग निघून १९७६मध्ये त्यांची विदर्भात अप्पर पेनगंगा प्रकल्पात नेमणूक झाली. व्यंकट गायकवाड हे सुरुवातीपासून धाडसी आणि झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्त्व असल्याने अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. पुढे व्यंकटरावांची बढती होऊन ते जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले. त्या वेळी जायकवाडीच्या उजव्या कालव्याचे काम सुरू होते. परंतु गेवराईजवळच्या जातेगावाजवळ कठीण खडकामुळे काम रखडले होते. अधिकारी वैतागून गेले होते. ते अधिकारी रजेवर गेल्यामुळे वरिष्ठांनी ती जबाबदारी व्यंकटराव यांच्यावर सोपविली. व्यंकटरावांनी अवघ्या तीस दिवसांत ते काम पूर्ण करून दाखवले. तेव्हापासून त्यांच्या नावाची प्रशंसा पाटबंधारे खात्यात सुरू झाली. १९८३मध्ये व्यंकटरावांची बदली नांदेडला विष्णुपुरी प्रकल्पात कार्यकारी अभियंता म्हणून झाली. विष्णुपुरी प्रकल्प म्हणजे आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा सिंचन योजना म्हणून तिचा गवगवा झाला होता. इतके मोठे काम पूर्वी महाराष्ट्रात झाले नसल्याने पाटबंधारे खात्यापुढेच प्रश्न निर्माण झाला होता. ते आव्हान व्यंकट गायकवाड यांनी समर्थपणे पेलले आणि अतिशय मेहनत घेऊन त्यांनी विष्णुपुरी प्रकल्प पूर्णत्वास नेला. विष्णुपुरी प्रकल्प म्हणजे पाटबंधारे खात्यातला एक मैलाचा दगड ठरला आहे. पुढे राजकीय घडामोडी घडल्या आणि डॉ.पद्मसिंह पाटील राज्याचे पाटबंधारे मंत्री झाले. त्या वेळी उस्मानाबाद जिल्हा सर्वांत जास्त दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक होता. कमी पाऊस, कमी नद्या असलेला भाग असल्याने पाणी साठवण करणे अवघड होते. परंतु आव्हानांचा सामना करणे हा व्यंकटरावांचा स्वभाव असल्याने त्यांनी आपल्या चांगल्या अधिकार्‍यांचा एक गट तयार केला. सांघिक कामावर त्यांचा भर होता. भौगोलिक असमतोलावर मात करून त्यांनी एकेकाळी सर्वांत जास्त दुष्काळग्रस्त असणारा उस्मानाबाद जिल्हा टँकरमुक्त केला. छोट्या छोट्या ओढ्या-नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे घालून पाण्याचा थेंब नि थेंब अडवून जिल्ह्याचा कायापालट केला. अडचणींचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाचे कौशल्य पणाला लावून व्यंकटराव आणि त्यांच्या अधिकारीवर्गाच्या चिवटपणामुळे लोअर तेरणा, माकणी यांसारखी अनेक मोठी धरणे व अनेक साठवण तलाव निर्माण झाले. दिडशेहून अधिक पाझर तलाव आणि एक हजाराहून जास्त कोल्हापुरी बंधारे या जिल्ह्यात निर्माण झाले. त्यामुळे आजही हा जिल्हा टँकरमुक्तच आहे. पुढे व्यंकटरावांना अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडे लातूर व बीड जिल्ह्यांचा कारभार होता. तेथेही त्यांनी अनेक प्रकल्पांची उभारणी केली. दरम्यानच्या काळात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि राजकीय बदलाचे वारे वाहिले. अनेक धोरणात्मक बदल घडून आले. कृष्णा खोर्‍याच्या पाण्याचा वापर कालबद्ध कार्यक्रम आखून सन २००० पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय झाला. याची अंमलबजावणी व्यंकटरावांनी केली. त्यासाठी खाजगी क्षेत्रातून निधी संकलन करणे आणि चांगल्या अधिकार्‍यांचा गट तयार करणे अशी प्रशासकीय कौशल्याची कामे त्यांनी केली.

शिल्पकार चरित्रकोश