पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड गानू, प्रभाकर लक्ष्मणराव सुरू करून शेवटी मधली द्वारे उभारण्याचा अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला. २४फेब्रुवारी१९७६ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला. त्यासाठी त्यांनी कोयना व जायकवाडी प्रकल्पातील काही अभियंत्यांना भातसा प्रकल्पात सामावून घेतले. भातसाच्या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक होते. या कालावधीत कामाचे दिवस वाया न घालविता गानू यांनी या पावसाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. खात्यामार्फत काम सुरू होण्यापूर्वी कंत्राटदाराने नऊ वर्षांत साडेचार लक्ष घनमीटर बांधकाम केले होते, तर गानू यांच्यासमोर साडेचार वर्षांत नऊ लक्ष घनमीटर काम करण्याचे आव्हान होते. या कामासाठी मदत म्हणून एक वेगळा यांत्रिकी विभाग सुरू करण्यात आला. त्यामध्ये त्यांना कृ.अ.ग्रामपुरोहित, नं.द.वडनेरे व एम.बी.देशपांडे या कार्यकारी अभियंत्यांची विशेष मदत झाली. सर्वांच्या सहकार्याने प्रभाकर गानू यांच्या नियोजनाखाली जून१९८०मध्ये ठरल्याप्रमाणे प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होऊन मुंबईला शंभर दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. यानंतर प्रभाकर गानू यांची नियुक्ती गुणनियंत्रण मंडळ, पुणे, अहमदनगर पाटबंधारे मंडळ, अहमदनगर व ऊर्ध्वपेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड येथे झाली. त्यानंतर त्यांची माजलगाव प्रकल्प मंडळावर व पुन्हा एकदा निम्न तेरणा प्रकल्पावर नियुक्ती झाली. बुडित क्षेत्रातील व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रखर विरोधामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण होते. या ठिकाणी शासनाने राज्य राखीव पोलीस दलाची एक सशस्त्र तुकडी तैनात केली होती. अशा वेळी पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून प्रभाकर गानू यांनी हा प्रश्न कौशल्याने हाताळला. लोकांचा प्रकल्पाला असलेला विरोध कमी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच १डिसेंबर१९८३ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प अवघ्या सहा वर्षांत द्वार उभारणी व प्रिकास्ट ब्रिजसह १९८९मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर प्रभाकर गानू यांची नियुक्ती औरंगाबाद येथे मुख्य अभियंता पदावर झाली. या कालावधीत त्यांनी कालव्याच्या कामासाठी, विविध भूस्तरांसाठी वितरकांचे काटछेद (प्रमाणीकरण) करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कालवे कामांची संकल्पना व अंमलबजावणीत सुलभता आली. ३१जानेवारी१९८९ रोजी ते मुख्य अभियंता पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर प्रभाकर गानूंच्या पुढाकाराने त्यांच्या काही नातेवाइकांसह त्यांनी गानू ट्रस्टची स्थापना केली. त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. अनाथाश्रमांना देणग्या दिल्या. त्यांच्या आईवडिलांच्या नावाने औरंगाबाद येथील सरस्वती भुवन या संस्थेत त्यांनी ‘लक्ष्मण जानकी स्मृती सभागृह’ बांधून दिले. त्यांची कर्मभूमी मराठवाड्यातील ते कार्यरत असलेल्या प्रकल्प परिसरातील महाविद्यालयीन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी एक लाख रुपये विभागून देण्याची संकल्पना कार्यान्वित होत आहे. - प्रदीप चिटगोपेकर

शिल्पकार चरित्रकोश २०९