पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग। गानू, प्रभाकर लक्ष्मण प्रशासन खंड दलित समाजातील पहिले आय.ए.एस. अधिकारी पद्माकर गवई हे त्यांचे कनिष्ठ बंधू होत. मधुकर गवई यांची दोनही मुले प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. ज्येष्ठ चिरंजीव शशीशेखर गवई हे भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये अधिकारी असून सध्या ते कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांचे धाकटे चिरंजीव सतीश गवई हे सध्या म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. - संध्या लिमये

गानू, प्रभाकर लक्ष्मण मुख्यअभियंता, पाटबंधारेविभाग २५ जानेवारी १९३१ - ऑक्टोबर २०१० प्रभाकर लक्ष्मण गानू यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचा हैदराबाद मुक्तिसंग्रामातही सहभाग होता. व्यवसायाने वकील असलेल्या लक्ष्मणराव गानू यांचा हैदराबाद येथील ‘विवेकवर्धिनी’ या संस्थेच्या स्थापनेत मोठा वाटा होता. प्रभाकर यांचे प्राथमिक, माध्यमिक सर्व शिक्षण विवेकवर्धिनीतच झाले. १९५४मध्ये त्यांनी स्थापत्यशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी मिळविली. १९५५मध्ये त्यांचा विवाह बार्शीच्या सुधा सहस्त्रबुद्धे यांच्यासमवेत झाला. १९५४मध्ये त्यांची नियुक्ती कर्नाटकातील रायचूर येथील तुंगभद्रा प्रकल्पावर झाली. भाषावार प्रांतरचनेनंतर १९५७ मध्ये ते मराठवाड्यातील येलदरी प्रकल्पावर रुजू झाले. शासकीय सेवेतील ओव्हरसियर ते मुख्य अभियंता अशा पदांवर त्यांनी काम केले. येलदरी प्रकल्पात त्यांना आरेखन विभागापासून वीजघराच्या कामापर्यंत अनुभव घेता आला. १९६६मध्ये ते पदोन्नतीवर जायकवाडी प्रकल्पाच्या दगडी धरणाचे कार्यकारी अभियंता झाले. सुरुवातीला धरणाचे अंदाजपत्रक, संकल्पचित्रे, निविदाविषयक प्राथमिक कामे पूर्ण केल्यावर १९६९मध्ये प्रत्यक्ष धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या कामाचे बांधकाम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले होते, त्याच्याकडून बर्‍याच चुका होऊन काम ठप्प झाले. त्यामुळे तत्कालीन पाटबंधारे खात्याचे मंत्री शंकरराव चव्हाणांच्या पुढाकाराने हे बांधकाम कंत्राटदाराऐवजी पाटबंधारे खात्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला गेला. हा असा पहिलाच प्रयोग होता. कार्यकारी अभियंता म्हणून प्रभाकर गानूंनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. या कामाचा पूर्वानुभव कोणासही नव्हता. परंतु व्यवस्थित केलेल्या नियोजनामुळे प्रभाकर गानू यांनी सहकार्‍यांसमवेत दोन ते तीन पाळ्यांत काम करून, तसेच कामाची गती व गुणवत्ता राखून वेगाने, अवघ्या तीस महिन्यांत व कमी खर्चात धरणाचे काम पूर्ण केले. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यात पैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्यांचाही विशेष सहभाग होता. १९७२मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्याच्या या कामात योगदान दिलेल्या कार्यकारी अभियंता ते शिपाई स्तरापर्यंतच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले. जायकवाडी दगडी धरणाच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामात प्रस्तंभ, द्वारे व ब्रिजचा अंतर्भाव होता. याच अभियंता चमूने पहिल्या टप्प्याच्याच जिद्दीने हे काम अवघ्या साडेतीन वर्षांत पूर्ण केले. हे करताना द्वार उभारणीचे काम दोन द्वार उभारणी उपविभागांच्या साहाय्याने एकाच वेळी धरणाच्या दोन्ही तीरांकडून २०८ शिल्पकार चरित्रकोश