पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड खुरसाळे, नारायण विठ्ठलराव ख । खुरसाळे, नारायण विठ्ठल मुख्य अभियंता - पाटबंधारे विभाग १५ मार्च १९१४ - १३ एप्रिल २००८ नारायण विठ्ठल खुरसाळे यांचे गाव अंबेजोगाई होय. त्या काळात अंबेजोगाईस केवळ सातवीपर्यंतची शाळा होती. नारायणराव आठवी पासूनच हैद्राबादला गेले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते हैद्राबाद राज्यात प्रथमश्रेणीत सर्वप्रथम उत्तीर्ण झाले होते व त्यामुळे त्या काळात त्यांना गोखले स्कॉलर म्हणायचे. आठवी ते बारावी असे त्यांचे शिक्षण त्या काळी शिक्षणाचा दर्जा चांगला असल्यामुळे नावाजलेल्या ‘सीटी कॉलेज’ मध्ये झाले. बारावीच्या परिक्षेत ते सर्वप्रथम आले होते. पुढे ते हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गेले. ते १९३६ मध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत आणि सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परिक्षेच्या एक दिवस आधी नारायणरावांच्या वडिलांचे निधन झाले होते. पण मनाला खंबीर ठेवून त्यांनी परीक्षा दिली. अभियांत्रिकी मध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे नारायणरावांची सरकारी नियमाप्रमाणे सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक झाली. मांजरा नदीवर असलेल्या निझामसागर धरणाच्या कामावर त्यांची पहिल्यांदा नेमणूक झाली होती. नंतर कार्यकारी अभियंता म्हणून ते तुंगभद्रा धरणाच्या कामावर होते. त्या काळात हैद्राबाद व मुंबई या दोन्ही राज्यांत सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खाते हे एकच होते आणि या दोन्ही शाखांकडे अधिकार्‍यांच्या नेमणूका आलटून-पालटून होत रहायच्या. नारायणराव यांना राज्य सरकारतर्फे अमेरिकेतील महामार्ग रचना (हायवे सिस्टिम) बघायला आणि त्याचा अभ्यास करायला पाठविण्यात आले. राज्य पुनर्रचना झाल्यावर ते औरंगाबादेत मराठवाड्याचे अधिक्षक अभियंता म्हणून आले. पुढे ते काही वर्षे मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेमध्ये व मुख्य अभियंता होईपर्यंत पुण्यात दख्खन पाटबंधारे मंडळाचे (डेक्कन इरिगेशन सर्कल) अधिक्षक अभियंता म्हणून होते. नंतर निवृत्तीपर्यंत ते मंत्रालयात मुख्य अभियंता म्हणून राहिले. १९७३ साली निवृत्त झाल्यानंतर ते काही वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य होते. वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत ते लोकसेवा आयोगाचे सदस्य होते. निवृत्तीनंतर या नेमणुकीमुळे आणि दोन्ही मुले व्यवसायामुळे कायम मुंबईतच रहात असल्यामुळे नारायणराव सांताक्रुझला एका सोसायटीत घर घेऊन राहिले होते. निवृत्तीनंतर नारायणरावांनी संस्कृत शिकून उपनिषदांचा अभ्यास केला. याच काळात मुंबईच्या रामकृष्ण आश्रमातील त्यांचे जाणे वाढले. नारायणराव कर्तव्यकठोर होते. तत्त्वाशी तडजोड करत नसत. मंत्रालयात एका उच्च पदावरून काम करत असताना अभियंता वर्गाला इतर व्यवस्थेकडून दुय्यम वागणूक देण्याचा जेव्हा जेव्हा कळत नकळत प्रयत्न झाला त्या त्या वेळी त्यांनी निर्भिडपणे राज्याचे शिल्पकार चरित्रकोश