पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड कुलकर्णी, भुजंगराव आप्पाराव १९६९ च्या अखेरीस त्यांनी राज्याच्या सिंचन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली व १९७४ च्या अखेरीस भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्यानंतर अभियांत्रिकी सेवेतील ज्येष्ठ अधिकारी सचिव म्हणून नेमण्याची परंपरा सुरू झाली. सुरुवातीलाच त्यांना कृष्णा, गोदावरी आणि नर्मदा या तीन खोर्‍यातील राज्या-राज्यातील पाण्याची वाटणी निश्चित करण्यासाठीच्या नेमलेल्या लवादाच्या समोर जावे लागले. याच कालखंडात खात्यात वेगवेगळ्या श्रेणीतील, वर्गवारीतील वर्ग १, वर्ग २ व वर्ग ३ मधील अभियत्यांच्या ज्येष्ठता ठरविण्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बढत्या थांबल्या होत्या, याला दीर्घकालीन उत्तर देण्याचे ऐतिहासिक काम १९७० साली भुजंगरावजी यांच्या कारकिर्दीतच हातावेगळे झाले आहे. म्हणून एका सभेत मा. शंकररावजी चव्हाण यांनी भुजंगरावजी यांचा ‘अभियांत्रिकी सेवांचे पुनर्रचनाकार’ म्हणून गौरव केला होता. सिंचन खात्यातील अंमलबजावणीच्या कामाचे विकेंद्रीकरण करून महसूल विभागाच्या धर्तीवर प्रादेशिक मुख्य अभियंत्यांची पदे निर्माण करण्यास तेच कारणीभूत ठरले आहेत. याच कालावधीत १९७२-७३ चा भयानक दुष्काळ, भंडारदरा धरणास आडवी भेग पडून निर्माण झालेला धरण फुटण्याचा धोका ह्या दोन मोठ्या संकटांवर त्यांना मात करावी लागली. १९७२-७३ च्या दुष्काळाने राज्यावर गंभीर परिस्थिती ओढवली. रिकाम्या हातांना काम देण्यासाठी दररोज ५० लक्ष लोक हजेरी पत्रकावर लावून जवळ जवळ ६५ ते ७० हजार दुष्काळी कामे हाती घेण्यात आली होती. रोजंदारीचा दर रु.२.५० होता. दुष्काळ निवारण्यासाठी केवळ मजुरीवर २५० कोटी रुपये खर्च झाले. या दुष्काळ निवारण्यात सिंचन विभागाला समर्थ नेतृत्व देण्यात भुजंगराव अग्रक्रमावर राहिले. कृष्णा, गोदावरी आणि नर्मदा या आंतरराज्यीय नदी खोर्‍यातील पाणी वाटपात महाराष्ट्र राज्याचे हित जपण्यात भुजंगरावजी यांच्या कार्यकुशलतेचा फारच मोठा वाटा आहे. अशा वेगवेगळ्या कठीण जबाबदार्‍या सांभाळून सचिव म्हणून ते १९७४ मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांच्याकडे ‘मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक’ पदाची जबाबदारी देण्यात आली. भुजंगराव हे पीएच.डी. झालेले नसतानाही त्यावेळचे राज्यपाल अलियावर जंग यांनी विद्यापीठाला चांगला प्रशासक हवा म्हणून त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नेमले. भुजंगरावांनी ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समितीवर सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

शिल्पकार चरित्रकोश १९५