पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुलकर्णी, भुजंगराव आप्पाराव प्रशासन खंड कुलकर्णी, भुजंगराव आप्पाराव सचिव, महाराष्ट्र राज्य ५ फेब्रुवारी १९१८ भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी यांचा जन्म परळी तालुक्यातील पिंपळगाव या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १९३२ ला औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३४ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. १९३६ साली हैदराबाद येथून ते प्रथमात प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण होऊन उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदक पटकावले. १९३८ साली एम.एस्सी. भौतिकशास्त्रामध्ये उस्मानिया विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू झाले. विद्यार्थीदशेत आर्य समाजाच्या विचार आचारांची त्यांना जवळीक वाटत असे. १९४० ला ते ‘डिस्ट्रीक्ट लँड रेकॉर्ड ऑफीसर’ म्हणून औरंगाबाद येथे रुजू झाले. प्लेगची साथ असल्याने ह्या नवीन कामासाठी ते निलंगा तालुक्यातील ‘दाबका’ या गावात दीड वर्षे कुटुंब व मुलाबाळांसह रानात राहिले. हेवा वाटावा असा ग्रंथांचा त्यांनी संग्रह केला. जवळचे पैसे संपले म्हणून हातातील अंगठी त्यांनी मोडली व ग्रंथ घेतले. १९४७ ला ते ‘असिस्टंट कमिशनर’ या श्रेणी-१ च्या मुलकी सेवेत आले. ते १९५० साली आय. ए. एस. झाले. याच काळात हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्याचे एक सदस्य राज्य झाल्यावर हैदराबाद राज्यातील जवळ जवळ १८०० जहागिरी बरखास्त करून तालुका व जिल्ह्याची फेररचना करण्याचे अवघड काम भुजंगरावांच्या हातून पार पडलेे. १९५३ ला ते नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. १९५४ ला भूमी आयोग स्थापन झाला. त्या विभागाचे सचिव म्हणून भुजंगरावांची नेमणूक झाली. या आयोगाचा अहवाल सचिव म्हणून भुजंगरावांनी तयार केला. १९५६ ला राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांबरोबर भुजंगराव मुंबई राज्यात आले आणि औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. १९५९ ला ते जनगणनेच्या कामासाठी भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या जनगणनेसाठी ‘प्रमुख’ म्हणून मुंबईत हे काम अवघड, जोखमीचे आणि भुजंगराव यांच्या प्रशासकीय कुशलतेला व कर्तृत्वाला आव्हान देणारे ठरले. एक मे १९६० ला महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. ही जनगणना म्हणजे महाराष्ट्राचे दर्शन घडविणे असा भावनात्मक आयाम भुजंगरावांनी या कामाला दिला. २६ जिल्ह्यातील जवळ जवळ १ लाख गणनाकारांना प्रशिक्षण देणे, व त्यांच्याकडून काम करून घेणे असे प्रचंड काम त्यांना करावे लागले. १९६५ ला पुणे महानगर पालिकेकडे ते म.न.पा. आयुक्त म्हणून आले. पुण्यातील नागरी जीवनाची सर्वांगीण प्रगतीचा तो काळ होता. या काळात पुण्याचे नेहरू स्टेडियम, बालगंधर्व रंगमंदिर, मंडईची इमारत, स्वच्छ पाणी, पुरवठा, चौकांची व रस्त्यांची सुधारणा, सारस बाग ही कामे त्यांच्या हातून पार पडली. पुण्याच्या प्रगतीतील हे मैलाचे दगड आहेत. हे सारे होत असताना १९६५ चे पाकिस्तान युद्ध, १९६७ चा कोयनेतील भूकंप यांना सुद्धा त्यांना तोंड द्यावे लागले. १९६९ ला ते सचिव म्हणून मुंबईत आले. सुरूवातीला नगरविकास, आरोग्य व गृहनिर्माण या तीन खात्याचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. एका मंत्र्यांनी आकसाने अवमूल्यन केल्याच्या संदर्भात त्यांनी मंत्र्यांना शांतपणे सांगितले,“माझे आव्हान आहे की, तुम्हाला माझ्याइतका चांगला सचिव मिळावयाचा नाही.” शिल्पकार चरित्रकोश