पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरदार पटेलांच्या या ठाम मतामागे जसा कालातीत द्रष्टेपणा होता, तशीच एक प्रकारची अपरिहार्यता होती. ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या प्रशासनाचा गाडा चालवण्यासाठी दुसरी यंत्रणा नव्हती. ब्रिटिश काळात जे भारतीय आय.सी.एस. अधिकारी होते, त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात दंगलग्रस्तांचे पुनर्वसन आणि साडेपाचशेच्या वर असलेली संस्थाने खालसा करून देश एकसंघ बनविण्यात महत्त्वाची भूमिका पटेलांच्या नेतृत्वाखाली पार पाडली होती. ही प्रशासकीय यंत्रणा एतद्देशीय करण्यासाठी व विकास प्रशासनाची जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम बनावी म्हणून तिचं नवं नामकरण भारतीय प्रशासन सेवा (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय.ए.एस.') असे केले आणि त्यांनी व एकूणच नोकरशाहीने तटस्थ राहत निर्भिडपणे सल्ला देणे आणि कायद्यांच्या-घटनेच्या चौकटीत काटेकोरपणे काम करण्यासाठी सरदार पटेलांनी नवे संकेत, परंपरा निर्माण केल्या. साधारणपणे १९७० च्या दशकापर्यंत स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्व करणारे नेते देश व राज्य पातळीवर राज्यकारभार करीत होते व त्यांच्या कामकाजाचा स्थायिभाव लोकसेवा, नि:स्पृहता व नि:स्वार्थपणा होता. तोवर भारतीय प्रशासनही, आजच्या भ्रष्टाचार व राजकारणाचे रंग धारण केलेल्या प्रशासनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रशासनाच्या सैध्दान्तिक भूमिकेत बसणारे, ब-याच प्रमाणात आदर्शवत होते. अशी परिस्थिती काही काळ टिकली, पण पुढे जेव्हा तत्त्वहीन स्वार्थाचे राजकारण सुरू झाले आणि बदलते जागतिक अर्थकारणांचे प्रवाह वेळीच न ओळखता, उदारीकरणाची कास न पकडल्यामुळे निर्माण झालेली कुंठित अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, परमिट-लायसेन्स राजमुळे बोकाळलेला भ्रष्टाचार, कमकुवत झालेली केंद्रीय सत्ता, विभिन्न राजकीय विचारधारेची राज्यपातळीवर आलेली सत्ता, मग आघाड्यांचे राजकारण, सबंध जगाचे झालेले बाजारीकरण, माहिती-तंत्रज्ञानाचा स्फोट आणि पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त युवावर्गाची समृद्ध जीवनाची वाढती आकांक्षा अशा आव्हानाला तोंड देण्यासाठी आवश्यक असणा-या प्रशासकीय सुधारणा करण्यात राज्यकर्त्यांना आलेले अपयश यामुळे भारतीय प्रशासन व्यवस्था गोंधळलेली व काहीशी दिशाहीन झाली आहे. परंतु राजकीय नेतृत्वाची घसरण पाहाता मागील साठ वर्षांत देशाची एकात्मता व अखंडता टिकवून धरण्यात नोकरशाहीने ब-यापैकी यश मिळवले आहे, हे आता सर्वमान्य झाले आहे. भारतीय प्रशासनाचे पर्यावरण भारतीय राज्याची वैशिष्ट्ये म्हणजे उदार लोकशाहीवादी राज्य, विकेंद्रित राज्यकारभार, सेक्युलर व लोककल्याणकारी प्रशासन करण्यात भारतीय नोकरशाहीचे योगदान मोलाचे आहे. प्रशासनाला प्रभावित करणारे जातिव्यवस्था, धर्म व जमातवाद, हिंसा आणि दहशतवाद हे चार सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत, तर सांस्कृतिक पर्यावरणात म. गांधींच्या प्रभावाने उदात्त अर्थाचे राजकारणाचे व लोकप्रशासनाचे आध्यात्मिकीकरण, सहिष्णुता व विश्वात्मकता हे तीन घटक येतात व तेही भारतीय प्रशासन कमी-अधिक प्रमाणात करतात. या सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणीय घटकातले चांगले नीरक्षीरविवेकाने टिपून ते आत्मसात करणे उच्च शिक्षण आणि प्रभावी प्रशिक्षणामुळे भारतीय प्रशासकांना अवघड नाही. पण वाढता राजकीय हस्तक्षेप, स्पर्धात्मक य राजकारण करण्याची चढाओढ, लोकशाही संसदीय प्रणालीच्या निकोप संकेत व परंपरांची होणारी पायमल्ली आणि ढासळती मूल्यव्यवस्था यामुळे भारतीय नोकरशाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, लाल फितशाही आणि बदलास नकार देण्याची मानसिकता वाढत चालली आहे. त्यामुळे लोकनीती व धोरणाची वेगवान व सुविहित अंमलबजावणी करून जनतेला प्रभावी, विकास व कल्याणकारी शिल्पकार चरित्रकोश १५३