पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होत. न्यायपालिका खंड | हिदायतुल्ला, मोहम्मद १डिसेंबर१९५८ रोजी न्या.हिदायतुल्ला यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. नऊ वर्षांनंतर २५ फेब्रुवारी १९६८ रोजी ते भारताचे सरन्यायाधीश झाले. सर्वोच न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बारा वर्षांची दीर्घ कारकीर्द लाभली. त्यातील सुमारे तीन वर्षे ते सरन्यायाधीश होते. या काळात सर्वोच्च न्यायालयापुढे अनेक महत्त्वाचे खटले आले व त्यामध्ये न्यायालयाने दिलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यापैकी सज्जनसिंह, गोलकनाथ आणि माजी संस्थानिकांची मान्यता व तनखे या संबंधीचा खटला आणि ‘पाँडेचरी येथील श्रीअरविंदांचा विश्वस्त न्यास हा ‘धार्मिक’ आहे की नाही’ या प्रश्नाबद्दलचा खटला हे विशेष उल्लेखनीय होत. यातील पहिल्या दोन खटल्यांच्या वेळी हिदायतुल्ला न्यायाधीश होते तर तिसर्‍याच्या वेळी सरन्यायाधीश होते. या तिन्ही खटल्यांत हिदायतुल्ला यांनी स्वत:ची विचारप्रवर्तक वेगळी निकालपत्रे लिहिली. यातील शेवटच्या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यावर लगेचच म्हणजे १६ डिसेंबर १९७० रोजी हिदायतुल्ला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. सरन्यायाधीश असताना ते ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’, ‘इंटरनॅशनल लॉ असोसिएशन’ची भारतीय शाखा व ‘इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ’ या संस्थांचे अध्यक्ष होते. हिदायतुल्ला सरन्यायाधीश झाल्यानंतर काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयात एक अकल्पित आणि अभूतपूर्व प्रसंग घडला. सरन्यायाधीशांच्या न्यायालयात त्यांच्यासह तीन न्यायाधीशांसमोर एक खटला चालू असताना एका माणसाने न्यायाधीशांवर खुनी हल्ला केला. सरन्यायाधीश हिदायतुल्ला यांनी प्रसंगावधान राखून हल्लेखोराशी मुकाबला केल्याने प्राणहानी झाली नाही. फक्त न्या.ग्रोव्हर यांच्या डोक्याला जखम झाली. नंतर जेव्हा त्या हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली फौजदारी खटला झाला, तेव्हा सरन्यायाधीशांसह तिन्ही न्यायाधीशांनी सत्र न्यायालयात साक्ष दिली. १९७४ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार होण्याबद्दल हिदायतुल्ला यांना विचारले गेले होते, पण त्यांनी उमेदवार होण्यास नकार दिला. त्यानंतरच्या १९७७ च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या नावाची थोडीफार चर्चा झाली, पण तो योग आला नाही. पुढे ऑगस्ट १९७९ मध्ये हिदायतुल्ला यांची उपराष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली. पूर्ण पाच वर्षे, म्हणजे ऑगस्ट १९८४ पर्यंत ते उपराष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती या नात्याने ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष होते. या दरम्यान १९८२ मध्ये ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीचेही अध्यक्ष होते. न्या.हिदायतुल्ला यांच्या नावावर योगायोगाने एक आगळा विक्रम नोंदला गेलेला आहे. तो असा की तेरा वर्षांच्या अंतराने त्यांना दोन वेळा हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहावे लागले. मात्र त्या दोन प्रसंगी ते स्वत: वेगवेगळ्या पदांवर होते. मे १९६९ मध्ये तेव्हाचे राष्ट्रपती डॉ.झाकिर हुसेन यांच्या अकस्मात निधनानंतर आधी उपराष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी हे हंगामी राष्ट्रपती झाले. परंतु त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यावेळी संसदेने तातडीने एक कायदा करून अशी तरतूद केली की अशा परिस्थितीत भारताच्या सरन्यायाधीशांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहावे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट १९६९ मध्ये सरन्यायाधीश हिदायतुल्ला यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. दुसर्‍या वेळी ऑक्टोबर १९८२ मध्ये राष्ट्रपती झैलसिंह यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपराष्ट्रपती हिदायतुल्लांनी पुन्हा हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. हिदायतुल्ला हे केवळ कायद्यात रमणारे रूक्ष वकील किंवा न्यायाधीश नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी, उमदे व प्रसन्न होते. इंग्रजीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते आणि इंग्रजी साहित्याचा, विशेषत: शेक्सपिअरच्या नाटकांचा त्यांचा व्यासंग शिल्पकार चरित्रकोश