पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिदायतुल्ला, मोहम्मद न्यायपालिका खंड हिदायतुल्ला, मोहम्मद कायदेपंडित, न्यायविद, भारताचेसरन्यायाधीश, उपराष्ट्रपती. १७ डिसेंबर १९०५ - १८ सप्टेंबर १९९२ मोहम्मद हिदायतुल्ला यांचा जन्म त्यावेळच्या मध्यप्रांतात एका खानदानी व सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील खानबहादुर हफीझ मोहम्मद विलायतुल्ला तत्कालीन मध्यप्रांत व वर्‍हाडात सरकारी नोकरीत विविध पदांवर होते. १९२८ मध्ये ते भंडारा येथून उपायुक्त (आताचे जिल्हाधिकारी) व जिल्हा दंडाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला व ते मध्य प्रांत, वर्‍हाडातील राखीव मुस्लिम मतदारसंघातून तेव्हाच्या केंद्रीय विधानसभेवर निवडून गेले. ते फारसी व उर्दूत कविताही करीत असत. वडिलांच्या वारंवार बदल्या होत असल्याने हिदायतुल्ला यांचे शालेय शिक्षण नागपूर, सिहोर, अकोला, छिंदवाडा, रायपूर, अशा विविध ठिकाणी झाले. १९२२ मध्ये ते रायपूरला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. छत्तीसगढ विभागात पहिले आल्याने त्यांना फिलिप शिष्यवृत्ती मिळाली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात प्रवेश घेतला. (त्याआधीच्या दोन वर्षांत, म्हणजे अनुक्रमे १९२० व १९२१ मध्ये हिदायतुल्लांचे मोठे भाऊ अहमदुल्ला आणि सर्वांत थोरले भाऊ इक्रामुल्ला यांनीही मॉरिस महाविद्यालयातच प्रवेश घेतला होता.) १९२६ मध्ये ते नागपूर विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये इंग्लिश ट्रायपॉस व लॉ ट्रायपॉससाठी आणि लंडनच्या लिंकन्स इन्मध्ये बॅरिस्टरच्या परीक्षेसाठी असा एकत्रित अभ्यास करून ते १९३० मध्ये बॅरिस्टर होऊन स्वदेशी परतले. लगेचच त्यांनी नागपूर येथे वकिली सुरू केली. १९३० ते १९३६ पर्यंत हिदायतुल्लांनी नागपूरच्या तेव्हाच्या न्याय आयुक्तांच्या न्यायालयात (ज्युडिशियल कमिशनर्स कोर्ट) वकिली केली. १९३६ मध्ये नागपूर उच्च न्यायालय स्थापन झाले. हिदायतुल्ला प्रथमपासूनच त्या न्यायालयातील यशस्वी वकील म्हणून ओळखले जाऊ लागले. १९४२-४३ मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. नंतर १९४३ ते १९४६ या काळात ते मध्य प्रांत व वर्‍हाडचे अ‍ॅडव्होकेट-जनरल होते. दरम्यान १९३५ ते १९४३ एवढा काळ त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या कायदा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले. याशिवाय नागपूर नगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासाचेही ते काही काळ सदस्य होते. १९४६ मध्ये नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून हिदायतुल्लांची नियुक्ती झाली. १९५४ मध्ये ते त्याच उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. नोव्हेंबर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या मध्य प्रदेश राज्यासाठी वेगळे उच्च न्यायालय जबलपूर येथे स्थापन झाले. त्याचे पहिले सरन्यायाधीश म्हणून हिदायतुल्ला यांची नियुक्ती झाली. त्या पदावर ते नोव्हेंबर १९५८ पर्यंत होते. नागपूर व जबलपूर येथील आपल्या वास्तव्यात हिदायतुल्ला यांनी नागपूर, सागर व विक्रम (उज्जैन) या विद्यापीठांत, त्याचप्रमाणे अलीगढ मुस्लीम विद्यापीठातही वेगवेगळी महत्त्वाची पदे भूषविली. विशेषत: नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी व शैक्षणिक मंडळांचे ते एकोणीस वर्षे (१९३४ ते १९५३) सदस्य होते, तर कायदा विद्याशाखेचे चार वर्षे (१९४९ ते १९५३) अधिष्ठाता होते. या काळात त्यांनी मध्य प्रदेश भारत स्काऊट व गाइडचे मुख्य आयुक्त म्हणून (१९५० ते १९५३) तर भारत स्काउट व गाइडच्या राष्ट्रीय मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही (१९५० ते १९५२) काम पाहिले.

शिल्पकार चरित्रकोश