पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड सोराबजी, सोली जहांगीर न्यायालयाचा सल्ला मागितला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सेटलवाड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बाजू मांडली. (विरुद्ध पक्षाची, म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेच्या सभापतींची बाजू एच.एम.सीरवाई यांनी मांडली होती.) सेटलवाड यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली. ‘वॉर अँड सिव्हिल लिबर्टीज्’ हे त्यांचे पहिले व महत्त्वाचे पुस्तक १९४६ मध्ये प्रसिद्ध झाले. १९६५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या न्या.तेलंग स्मारक व्याख्यानमालेत त्यांनी भारताच्या घटनेवर दिलेली विद्वत्तापूर्ण व्याख्याने १९६७ मध्ये ‘द इंडियन कॉन्स्टिट्यूशन : १९५० - १९६५’ या पुस्तकात प्रसिद्ध झाली. त्यांनी लिहिलेले भुलाभाई देसाई यांचे चरित्र १९६८ मध्ये प्रसिद्ध झाले. ‘माय लाईफ : लॉ अँड अदर थिंग्ज्’ हे त्यांचे प्रदीर्घ आणि अत्यंत वाचनीय व माहितीपूर्ण आत्मचरित्र १९७० मध्ये प्रसिद्ध झाले. सेटलवाड पितापुत्रांच्या प्रदीर्घ आत्मचरित्रांमधून सुमारे १८७० ते १९७० या शतकाभराच्या काळातील देशाच्या समग्र इतिहासाचे प्रत्ययकारी दर्शन घडते. मोतीलाल सेटलवाड यांना अनेक सन्मान मिळाले. १९५७ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा सन्मान देऊन गौरव केला. (स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी १९४१ मध्ये ब्रिटीश सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब देऊ केला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला.) १९५० पासून १९६८ पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. बार असोसिएशन ऑफ इंडिया ही वकिलांची एक नवी अखिल भारतीय संघटना १९५९ मध्ये स्थापन झाली. सेटलवाड या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. याशिवाय ते ब्रिटिश कौन्सिलच्या ‘लॉ कमिटी’चे, त्याचप्रमाणे ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड कम्पॅरेटिव्ह लॉ’ या संस्थेचे ‘कॉरस्पाँडिंग मेंबर’सुद्धा होते. - शरच्चंद्र पानसे सोराबजी, सोली जहांगीर न्यायविद, भारताचे अ‍ॅटर्नी-जनरल ९ मार्च १९३० सोली जहांगीर सोराबजी यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षण मुंबईतच झाले. १९५२ मध्ये शासकीय विधि महाविद्यालयातून एलएल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९५३ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. कॉलेजमध्ये त्यांना रोमन कायदा आणि न्यायशास्त्रातील(ज्युरिस्प्रुडन्स) ‘किनलॉक फोर्ब्ज सुवर्णपदक’ मिळाले. १९७१ पासून ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून वकिली करू लागले. १९७७ ते १९८० या काळात ते भारताचे सॉलिसिटर-जनरल होते. डिसेंबर १९८९ ते डिसेंबर १९९० या वर्षभराच्या काळात आणि नंतर पुन्हा एप्रिल १९९८ ते मे २००४ पर्यंत ते भारताचे अ‍ॅटर्नी-जनरल होते. अशा रीतीने दोन वेळा अ‍ॅटर्नी-जनरल होण्याचा मान सोराबजी यांना सर्वप्रथम मिळाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील विविध क्षेत्रांतील संस्था, संघटना, समित्या, आयोग इत्यादींशी सोराबजी यांचा पदाधिकारी म्हणून घनिष्ठ संबंध आहे. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेच्या भारतीय शाखेच्या सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, तर ‘मायनॉरिटी राइट्स् ग्रूप’ या संघटनेचे निमंत्रक आहेत. दिल्ली येथील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’चे ते अध्यक्ष आहेत, तर ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष आहेत, बंगलोर येथील ‘नॅशनल लॉ स्कूल’मध्ये ते मानद प्राध्यापक आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क आयोगाच्या आणि अल्पसंख्यांकांच्या हक्करक्षणावरील उप-आयोगाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. २००० ते शिल्पकार चरित्रकोश १२९ स ।