पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड सेटलवाड, मोतीलाल चिमणलाल व त्याच्याशी संलग्न असलेले राजे एडवर्ड स्मृती रुग्णालय (के.ई.एम.) स्थापन करण्यातही सर चिमणलाल यांची विद्यापीठ व महानगरपालिका या दोन्ही संस्थांतर्फे महत्त्वाची भूमिका होती. १९१५ मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या तेव्हाच्या केंद्रीय (इंपीरियल) विधिमंडळातील जागेवर सर चिमणलाल यांची प्रथम निवड झाली. १९१७ पर्यंत ते केंद्रीय विधिमंडळात होते. नंतर १९१९च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय विधानसभेवर सर चिमणलाल १९२०मध्ये निवडून आले, पण त्याचवेळी मुंबई प्रांताच्या गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळावर त्यांची नियुक्ती झाल्यामुळे ते प्रत्यक्षात केंद्रीय विधानसभेचे सदस्य होऊ शकले नाहीत. १९२० मध्येच चार महिने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. १९२३ मध्ये त्यांनी कार्यकारी मंडळाचा राजीनामा दिल्यावर व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंग यांनी त्यांची केंद्रीय विधानसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. १९२४ मध्ये अल्पकाळ त्यांनी सभागृहाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९१८ मध्ये काँग्रेसमधील नेमस्त विचारांच्या मंडळींनी नॅशनल लिबरल फेडरेशन ऑफ इंडिया किंवा लिबरल पार्टी या नावाने एक वेगळा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या स्थापनेपासून सर चिमणलाल हे त्याचे अग्रगण्य नेते होते. १९१८ मध्येच माँटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणांवर विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड साउथबरो यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दोन समित्यांपैकी एका समितीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९१९ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या हंटर समितीच्या तीन भारतीय सदस्यांपैकी सर चिमणलाल हे एक होते. समितीत ब्रिटिश सदस्य व भारतीय सदस्य असे उभे तट पडले आणि तिन्ही भारतीय सदस्यांनी आपला स्वतंत्र भिन्नमत-अहवाल सादर केला. ब्रिटिश सरकारने १९२० मध्ये चिमणलाल सेटलवाड यांना ‘सर’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज्’ (एलएल.डी) ही सन्मान्य पदवी दिली. १९१९ च्या कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९२८ मध्ये सायमन आयोग नेमला. त्यात एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे संपूर्ण देशात असंतोष उसळला. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार टाकला. लिबरल पार्टीनेही मुंबईत या आयोगाविरुद्ध आवाज उठविला. त्यामध्ये सर चिमणलाल यांचा सक्रिय सहभाग होता. तथापि १९३० व १९३१ मध्ये लंडनमध्ये भरलेल्या अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या गोलमेज परिषदेस सर चिमणलाल हे अन्य नेमस्त नेत्यांसमवेत उपस्थित राहिले. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत सर चिमणलाल हे तेव्हा अस्तिवात असलेल्या लहानमोठ्या संस्थानांच्या संस्थानिकांना कायद्याच्या किंवा अन्य प्रश्नांवर सल्ला देत असत, त्याचप्रमाणे न्यायालयांसमोर किंवा अन्यत्र त्यांची बाजू मांडीत असत. ‘रिकलेक्शन्स अ‍ॅन्ड रिफ्लेक्शन्स’हे सरचिमणलाल यांचे प्रदीर्घ व उद्बोधक आत्मचरित्र १९४६मध्ये प्रसिद्ध झाले. ब्रिटिश अमदानीच्या पाऊण शतकाचा देशाचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कायदा-न्यायविषयक इतिहास त्यात प्रतिबिंबित झाला आहे. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. सेटलवाड, चिमणलाल; ‘रिकलेक्शन्स अँड रिफ्लेक्शन्स’.

सेटलवाड, मोतीलाल चिमणलाल कायदेपंडित व न्यायविद, स्वतंत्र भारताचे पहिले अ‍ॅटर्नी-जनरल १२ नोव्हेंबर १८८४ - १ ऑगस्ट १९७४ मोतीलाल चिमणलाल सेटलवाड यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला. वकिलीची व कायद्याच्या अभ्यासाची परंपरा त्यांच्या घराण्यात त्यांचे पणजोबा शिल्पकार चरित्रकोश १२७