पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सेटलवाड, चिमणलाल हरिलाल न्यायपालिका खंड सेटलवाड, चिमणलाल हरिलाल नामवंत वकील आणि शिक्षणतज्ज्ञ जुलै १८६५ - १० डिसेंबर १९४७ चिमणलाल सेटलवाड यांचा जन्म गुजराथमधील भडोच येथे झाला. त्यांचे आजोबा अंबाशंकर यांच्यापासून त्यांच्या घराण्यात वकिलीची व कायद्याच्या अभ्यासाची परंपरा चालत आली होती. अंबाशंकर हे अहमदाबादचे ‘मुख्य सदर अमीन’ होते. चिमणलाल यांचे वडील हरिलाल यांनीही न्यायखात्यामध्ये दुय्यम न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. त्या पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर ते सौराष्ट्रातील लिंबडी संस्थानाचे दिवाण होते. ही परंपरा सर चिमणलाल यांचे चिरंजीव मोतीलाल यांनी समर्थपणे पुढे चालविली. सर चिमणलाल यांचे शालेय शिक्षण उमरेठ आणि अहमदाबाद येथे झाले. १८८० मध्ये अहमदाबादच्या आर.सी. हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयातून १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंंतर वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी केवळ चार दिवस गुजराथमध्ये सरकारी नोकरी केली, परंतु लगेचच नोकरी सोडून कायद्याच्या अभ्यासासाठी ते पुन्हा मुंबईला आले. एलएल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १८८७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिलीस सुरुवात केली. १८९८ च्या सुमारास त्यांना मूळ शाखेतही विभागातही वकिली करण्याची अनुमती मिळाली. तोपर्यंतच एक निष्णात वकील म्हणून त्यांचे नाव झाले होते. सर चिमणलाल यांच्या राजकीय कार्याची तसेच एकंदर सार्वजनिक जीवनाची सुरुवात ते कायद्याचे विद्यार्थी असतानाच झाली. डिसेंबर १८८५ मध्ये मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हाचा समारंभ पाहण्यास आपण हजर होतो, असे त्यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. १८८९मध्ये मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते सदस्य होते. सर चिमणलाल यांनी दीर्घकाळ विविध पातळ्यांवर लोकप्रतिनिधी म्हणून संस्मरणीय कार्य केले. १८९२ पासून १९२० पर्यंत (मधली तीन वर्षे वगळता) ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. या अवधीत १८९३ पासून १८९७ पर्यंत ते तेव्हाच्या मुंबई इलाख्याच्या उत्तर विभागातील नगरपालिकांचे प्रतिनिधी म्हणून गव्हर्नरच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. १९०३ ते १९२० अशी सलग १७ वर्षे ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळा समितीचे आधी सदस्य आणि नंतर अध्यक्ष होते. शाळा समितीमधील त्यांच्या कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षणात अनेक सुधारणा झाल्या. अनेक शाळांसाठी इमारती बांधण्यात आल्या. महानगरपालिकेत असतानाच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही सर चिमणलाल यांनी भरीव कार्य केले. १८९५ पासून अर्धशतकापेक्षा अधिक काळ ते मुंबई विद्यापीठाचे प्रारंभी काही काळ पदवीधरांनी निवडून दिलेले व त्यानंतर कुलपतींनी नियुक्त केलेले फेलो होते, तर १८९९ पासून १९२९ पर्यंत विद्यापीठाच्या सिंडिकेटचे सदस्य होते. या दरम्यान १९०३ ते १९१५ अशी १२ वर्षे ते विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते. याशिवाय १९१७ पासून १९२९ पर्यंत सलग १२ वर्षे ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूही होते. कुलगुरू म्हणून एवढी दीर्घ कारकीर्द त्यापूर्वी कोणासही मिळाली नव्हती आणि त्यानंतरही अद्याप कोणास मिळालेली नाही. आपल्या कारकिर्दीत सर चिमणलाल यांनी विद्यापीठात अनेक शैक्षणिक व प्रशासनात्मक सुधारणा केल्या आणि विद्यापीठाचा लौकिक वाढविला. विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), यू.डी.सी.टी. या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेला रासायनिक तंत्रज्ञान विभाग आणि इतर अनेक पदव्युत्तर विभाग त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाले. आजचे प्रसिद्ध जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय १२६ शिल्पकार चरित्रकोश