पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साठे, सत्यरंजन पुरुषोत्तम न्यायपालिका खंड सल्लागार समितीचे सदस्य, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रम विकास केंद्राचे सदस्य, नवी दिल्ली येथील ‘पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सपोर्ट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर’चे विश्वस्त आणि पुणे विद्यापीठाच्या ‘कायदेविषयक सल्लागार समिती’चे सदस्य म्हणून काम पाहिले. याशिवाय ते दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंनी नेमलेल्या ‘लॉ फॅकल्टी रिव्ह्यू कमिटी’चे सदस्य, ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रकाशनाच्या ‘लॉ इन इंडिया’ या मालेचे सल्लागार, बटरवर्थ्स् कंपनीच्या ‘हॅल्सबरीज् लॉज् ऑफ इंडिया’ या मालेच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायदा पॅनलचेही सदस्य होते. याव्यतिरिक्त १९६६ ते १९७८ डॉ.साठे मुंबईच्या प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयामध्ये आणि नंतर पुण्याच्या ‘राष्ट्रीय विमा प्रबोधिनी’ व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’, मुंबईची टाटा समाजशास्त्र संस्था व हैदराबादची सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी यांमध्ये अतिथी अधिव्याख्याते होते. त्याप्रमाणे बंगलोरच्या ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ व हैदराबादच्या ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ लीगल स्टडीज् अ‍ॅन्ड रिसर्च’ या संस्थांचे ते मार्गदर्शक (रिसोर्स पर्सन) होते. “मी कार्यकर्ता नाही” असे डॉ.साठे स्वत: म्हणत; तथापि ‘अ‍ॅकॅडमिक’ विश्वाच्या बाहेरच्या प्रत्यक्षातील जगातल्या जीवनाशी आणि प्रश्नांशी त्यांचा सतत संपर्क असे. वृत्तपत्रांत विविध विषयांवर उद्बोधक लेख लिहिण्याव्यतिरिक्त विविध संस्था आणि संघटनांशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पुण्याच्या ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’चे ते उपाध्यक्ष होते, तर ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’चे आणि ‘शिशुआधार’ या संस्थेचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे ‘इचलकरंजी एज्युकेशन एन्डॉवमेंट फंड’चे ते १९७८ पासून विश्वस्त होते. विविध विद्यापीठांच्या किंवा इतर संस्थांच्या निवड समित्यांचे सदस्य म्हणूनही डॉ. साठे यांनी वेळोवेळी काम केले. यांमध्ये, अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळणार्‍या फुलब्राइट फेलोशिप आणि फोर्ड फाउंडेशन आंतरराष्ट्रीय फेलोशिप यांसाठीच्या निवड समित्यांचा, तसेच मुंबई विद्यापीठ, कोचिन विद्यापीठ, दक्षिण गुजरात विद्यापीठ, लखनऊचे बाबासाहेब आंबडकर विद्यापीठ, दिल्लीची ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट आणि बंगलोर येथील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ यांच्या अध्यापक-निवड समित्यांचा उल्लेख करता येईल. याशिवाय विशेष उल्लेखनीय दोन गोष्टी म्हणजे, विवेक पंडित विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात ठाणे जिल्ह्यातील वेठबिगारांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष १तेथे जाऊन पाहणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने डॉ.साठे यांची नियुक्ती केली; त्याचप्रमाणे नोव्हेंबर १९९४ मध्ये नागपूरमध्ये चेंगराचेंगरी होऊन गोवारी समाजाचे शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले, या घटनेचीही डॉ.साठे यांनी काही सामाजिक संस्थांच्या वतीने चौकशी केली. १९७७ मध्ये ‘कायदेविषयक मदत’ (लीगल एड) या संकल्पनेचा समावेश घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांत करण्यात आला. त्याच्या आधीच म्हणजे, १९७६ मध्ये डॉ.साठे यांनी आय.एल.एस. विधि महाविद्यालयामध्ये ‘लीगल एड सेंटर’ सुरू केले. महाविद्यालयाच्या विद्याथ्यार्र्ंसाठी ‘वकिलीची कौशल्ये’ शिकण्याची प्रयोगशाळा आणि त्याचवेळी भारतीय समाज जवळून समजून घेण्याची संधी’ अशा दुहेरी भूमिकेतून त्यांनी या केंद्राची उभारणी केली. हे कार्य आजही चालू आहे. डॉ.साठे उत्कृष्ट वक्ते होते. इंग्रजीत किंवा मराठीत, कोणताही विषय सुगम व ओघवत्या भाषेत प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे देशात आणि परदेशात, विद्यापीठांतील परिसंवाद किंवा इतर व्यासपीठांवरून त्यांनी अनेकानेक महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली. १९८३ ते २००२ या काळात त्यांनी दिलेल्या अशा व्याख्यानांपैकी निवडक व्याख्यानांची संख्या सव्वीस भरते.

१२० शिल्पकार चरित्रकोश