पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड सावंत, अरविंद विनायकराव |डॉ.साठे एकीकडे हाडाचे शिक्षक (किंवा प्राध्यापक) असतानाच दुसरीकडे हाडाचे संशोधक आणि मार्गदर्शक होते. साहजिकच ते पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. मुंबई, पुणे, उस्मानिया आणि शिवाजी विद्यापीठांतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली. ‘आय.ए.एल.एस.’ या आपल्या संस्थेतर्फे डॉ.साठे यांनी स्वत: अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले. याशिवाय या संस्थेने डॉ.साठे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायाधीश, सरकारी अधिकारी, वकील, यांच्यासाठी विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या. ग्राहक संरक्षण कायदा आणि ‘स्त्रिया आणि कायदा’ या विषयांवर संस्थेने स्वतंत्र अभ्यासक्रमही तयार केले आहेत. डॉ. साठे यांनी नऊ पुस्तके लिहिली किंवा संपादित केली आहेत, तर विविध नियतकालिकांतून आणि जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख किंवा शोधनिबंध, त्याचप्रमाणे विविध संपादित पुस्तकांत त्यांनी विशिष्ट विषयांवर लिहिलेली प्रकरणे, या सर्वांची एकूण संख्या सुमारे २०० आहे. ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ’ हे त्यांचे गाजलेले पहिले महत्त्वाचे पुस्तक. १९७० मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या २००४ पर्यंत सात आवृत्त्या निघाल्या. २००२ मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे महत्त्वाचे पुस्तक ‘ज्युडिशिअल अ‍ॅक्टिव्हिझम इन इंडिया : ट्रान्सग्रेसिंग बॉर्डर्स अ‍ॅण्ड एनफोर्सिंग लिमिट्स्’ हेही गाजले. त्यानंतर अगदी अलिकडे ‘ऑक्सफर्ड’ने प्रकाशित केलेल्या ‘इंटरप्रिटिंग कॉन्स्टिट्यूशन्स् : अ कम्पॅरिटिव्ह स्टडी’ या पुस्तकात डॉ.साठे यांनी आपल्या घटनेवर लिहिलेले प्रकरण ‘फ्रॉम पॉझिटिव्हिझम् टू स्ट्रक्चरॅलिझम्’ अतिशय सरस उतरले आहे. एवढे चतुरस्र कर्तृत्त्व आणि व्युत्पन्न व्यक्तिमत्त्व असलेले डॉ.साठे अतिशय साधे, निगर्वी, मनमिळाऊ होते. आपल्या विद्यार्थ्यांवर ते पितृवत् प्रेम करीत. प्रथमदर्शनीच त्यांच्याबद्दल मनात आदर उत्पन्न होई आणि मनावर त्यांची कायमची छाप पडे. न्यायशास्त्र (ज्युरिस्प्रुडन्स), तुलनात्मक कायदा आणि भारताची घटना आणि घटनात्मक कायदा या विषयांवरील त्यांचे वर्ग म्हणजे बौद्धिक मेजवानी असे. कायदा हा त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर समजून घेतला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. मुख्य म्हणजे वर्गात कोणीही, कोणताही प्रश्न केव्हाही विचारण्याची मुभा असे. त्यांच्या घरीही विद्यार्थ्यांना मुक्तद्वार असे. आय.एल.एस. विधि महाविद्यालयाचे आज देश-विदेशात जे स्थान आहे, त्याला जी प्रतिष्ठा आहे, त्याचा पाया प्राचार्य घारपुरे यांनी १९२४ मध्ये घातला, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य प्राचार्य पंडित यांनी त्याचा विस्तार केला आणि विकास घडविला, तर प्रा.पंडितांचे शिष्य डॉ.साठे यांनी त्यावर कळस चढविला, असेे म्हणता येईल. - शरच्चंद्र पानसे

सावंत, अरविंद विनायकराव मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केरळ उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश १७ सप्टेंबर १९३८ अरविंद विनायकराव सावंत यांचे शिक्षण बी.कॉम आणि एलएल.एम. या पदव्यांपर्यंत औरंगाबाद येथे झाले. ८जानेवारी१९६० रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. १९७० ते १९७६ पर्यंत त्यांनी कायद्याचे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम केले. १९७४ ते १९७७ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत ‘पब्लिक प्रॉसिक्यूटर’ आणि सहायक सरकारी वकील होते. केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनलवरही ते काही काळ होते. १२ मार्च १९८२ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे ‘अ‍ॅडव्होकेट-जनरल’ म्हणून झाली. शिल्पकार चरित्रकोश