पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड साठे, सत्यरंजन पुरुषोत्तम साठे, सत्यरंजन पुरुषोत्तम ज्येष्ठन्यायविद २७ मार्च १९३१ - १० मार्च २००६ सत्यरंजन पुरुषोत्तम साठे यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्या वेळच्या मध्य प्रदेशात झाले. आय.एल.एस. विधि महाविद्यालयातून एलएल.बी. आणि एलएल.एम. या पदव्या त्यांनी संपादन केल्या. (त्याकाळी एलएल.एम.चे वर्गही विधि महाविद्यालयामध्येच भरत असत.) कायद्याच्या अध्यापनाच्या, संशोधनाच्या आणि लेखनाच्या क्षेत्रांतील डॉ.साठे यांच्या प्रदीर्घ आणि धवल कारकिर्दीची सुरुवात बनारस हिंदू विद्यापीठापासून झाली. नोव्हेंबर १९५७ ते मे १९५८ या अवधीत ते तेथे कायदा विद्याशाखेत अधिव्याख्याता (लेक्चरर) होते. त्यानंतर जून १९५८ ते एप्रिल १९६० या काळात ते दिल्लीला ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’मध्ये संशोधन अधिकारी होते. तेथून ते मुंबई विद्यापीठात आले. तेथे ते कायदा विभागात एप्रिल १९६० ते डिसेंबर १९६६ अधिव्याख्याता आणि नंतर जानेवारी १९६७ ते मे १९७६ प्रपाठक होते. अधिव्याख्याता असतानाच १९६४-६५ मध्ये ‘रेमंड इंटरनॅशनल फेलोशिप’ मिळाल्याने ते अमेरिकेत गेले. शिकागोमधील ‘नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ’मधून त्यांनी ‘डॉक्टर ऑफ ज्युरिडिकल सायन्स’ (एस.जे.डी.) ही पदवी संपादन केली. डॉ.साठे ज्या महाविद्यालयाचे एकेकाळी विद्यार्थी होते, त्या पुण्याच्या आय.एल.एस. विधि महाविद्यालयाचे ते जून १९७६ मध्ये प्राचार्य झाले. पंधरा वर्षांहून अधिक काळ म्हणजे नोव्हेंबर १९९१ पर्यंत त्यांनी महाविद्यालयाची धुरा अत्यंत समर्थपणे आणि यशस्वीरीत्या सांभाळली. याच अवधीत एक वर्षभर (एप्रिल १९८५ ते एप्रिल १९८६) ते पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. कायदेविषयक प्रश्नासंबंधी प्रगत संशोधनास चालना आणि उत्तेजन देण्यासाठी इंडियन लॉ सोसायटीच्या विद्यमाने त्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज्’ (आय.ए.एल.एस.) या संस्थेची स्थापना केली. नोव्हेंबर १९९१ मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यावर डॉ.साठे या संस्थेचे मानद संचालक झाले. याशिवाय २००१ पासून अखेरपर्यंत ते पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांची ही नियुक्ती मुंबर्ई उच्च न्यायालयाने केली होती. आय.एल.एस. विधि महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘आय.ए.एल.एस.’चे मानद संचालक आणि नंतर डेक्कन महाविद्यालयाचे अध्यक्ष या मोठ्या आणि महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळत असतानाच डॉ.साठे यांच्याकडे अन्य असंख्य जबाबदार्‍याही चालत येत असत आणि त्याही ते तेवढ्याच उत्साहाने आणि यशस्वीरीत्या पार पाडीत असत. त्यांपैकी कायद्याशी किंवा कायद्याच्या अध्ययन व अध्यापनाशी संबंधित विशेष महत्त्वाच्या, अ‍ॅकॅडमिक जबाबदार्‍यांचा उल्लेख करायचा झाल्यास, डॉ.साठे यांनी वेळोवेळी ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’च्या जर्नलच्या संपादकीय शिल्पकार चरित्रकोश