पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मजकुराची सुरुवात करून त्यात चरित्रनायकाची व्यक्तिगत माहिती, शिक्षण, कार्यक्षेत्राची ठिकाणे व पदे, त्यांचे आपल्या क्षेत्रातील कार्य, त्यांनी गाजवलेले कर्तृत्व, ज्या कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्याची माहिती, त्यांना मिळालेले मानसन्मान आणि पुरस्कार यांचा उल्लेख केला आहे. काही ठिकाणी चरित्रनायकांशी संबंधित संस्था वा आस्थापने यांची छायाचित्रे देण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे संरक्षण खंडात चरित्रनायकांशी संबंधित असलेल्या घटना वा प्रसंगांची छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत.
 संदर्भसूची

 चरित्रनोंदीत समाविष्ट माहितीची विश्वसनीयता आणि अधिकृतपणा लक्षात यावा या हेतूने नोंदीच्या शेवटी सदर नोंद लिहिण्यासाठी ज्या संदर्भसाधनांचा वापर केला गेला आहे, त्यांची सूची दिलेली आहे. यामागची थोडी व्यापक भूमिका अशीही आहे की, ज्यांना सदर चरित्रनायकांबाबत अधिक अभ्यास अथवा संशोधक करायचे आहे त्यांना त्याचा उपयोग व्हावा. याच दृष्टीने बहुसंख्य चरित्रनोंदीच्या खाली संदर्भसूची देण्याचा प्रयत्न झालेला आहे. या संदर्भलेखनात पुढीलप्रमाणे शिस्त पाळण्यात आलेली आहे :

 लेखकाचे नाव, संपादक असल्यास तसा उल्लेख; 'साहित्यकृतीचे नाव, साहित्यकृतीचा प्रकार; प्रकाशक, प्रकाशनस्थळ; आवृत्ती, प्रकाशनवर्ष.

 जर नोंद लेखकाने मासिकातील आणि नियतकालिकातील लेखांचा आपल्या लेखनासाठी संदर्भ म्हणून उपयोग केला असेल तर संदर्भलेखनात पुढीलप्रमाणे शिस्त पाळण्यात आलेली आहे:

 'मासिकाचे अथवा नियतकालिकाचे नाव '; प्रकाशन महिना व वर्ष.

 हाती आलेल्या अपुऱ्या माहितीमुळे अपवादाने काही ठिकाणी सदरची शिस्त पाळता आलेली नाही, हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.

 ज्या ठिकाणी नामोल्लेख नोंद घेण्यात आलेली आहे. तेथे दोन प्रकार संभवतात:

 १. जर त्या व्यक्तीची अन्य खंडात मुख्य चरित्रनोद दिलेली असेल तर तर्जनी चिन्हाचा उपयोग करून तेथे 'मुख्य चरित्रनोंद समाजकारण खंड, पत्रकारिता खंड' आदी नमूद करण्यात आलेले आहे.

 २. जर त्या व्यक्तीची नोंद याच खंडात अन्यत्र वेगळ्या नावाने दिलेली असेल, तर तर्जनी चिन्हाचा उपयोग करून ज्या नावाने ती नोंद आढळेल ते नाव देण्यात आले आहे.

 चरित्रनायक वर्गीकरण

 हा विषयाधारित कोश असल्यामुळे यात चरित्रनायकांचा त्यांच्या क्षेत्रातील निकष ठरवून त्यांचा कोशात समावेश करण्यात आलेला आहे. या प्रक्रियेसंबंधीची माहिती प्रत्येक खंडाचे संपादक अथवा समन्वयक यांनी आपल्या संपादकीयात अथवा मनोगतात विस्ताराने दिलेली आहे. तसे पाहता काही व्यक्तींचे कर्तृत्व बहुआयामी असल्यामुळे त्यांची नोंद त्या त्या विशिष्ट खंडात येणे अपरिहार्य असते. उदाहरणार्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची टिपणनोंद न्यायपालिका खंडात समाविष्ट केलेली आहे. त्यांची मुख्य नोंद राजकारण खंडात येणार आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यामुळे न्यायपालिका खंड सिद्ध करताना त्यांची दखल घेणे अत्यावश्यकच आहे. अन्य काही चरित्रनायकांचाही अशाच प्रकारे विचार करण्यात आला आहे.

 अकारविल्हे
चरित्रकोशातील वर्णमाला, सर्व नावांचा अकारविल्हे स्वरानंतर व्यंजने असा पुढीलप्रमाणे असेल : अ अ आ आ इ ई उ ऊ ऋ


शिल्पकार चरित्रकोश

न्यायपालिका खंड / ११