पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सर्व टिपणांच्या सुरुवातीलाच सदर चरित्रनायकाची मुख्य नोंद ज्या खंडात आहे, त्या खंडाचे नाव देण्याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. जेणेकरून वाचकांना ती संपूर्ण नोंद त्या-त्या टिपणासोबत वाचता येईल.
 मुख्य चरित्रनोंद ही एकाच खंडात घेण्याचा निर्णय हा मुख्यत्वे सामायिक मुद्द्यांची उदाहरणार्थ जन्म, बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, मृत्यू यासारख्या माहितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच घेण्यात आलेला आहे. याचबरोबर मुख्य चरित्रनोंद व टिपणनोंद यांच्या ठिकाणी आणखी एक सुविधा देण्यात आलेली आहे, ती म्हणजे चरित्रनायकाचा एका ओळीत परिचय. हा परिचय वाचल्यानंतर त्या व्यक्तीचे बहुआयामी कार्य वाचकांच्या लक्षात येईल व त्या क्षेत्रांच्या अनुषंगाने त्या-त्या विषयांच्या खंडांत चरित्रनायकाच्या टिपणनोंदी त्यांना वाचता येतील.
 या टिपणनोंदीत नेमकेपणाने चरित्रनायकाच्या त्या विशिष्ट क्षेत्रातील कार्याची माहिती येईल व व्यक्तीच्या मुख्य नोंदीत त्याचा चरित्रविषयक तपशील व सोबत त्याचे छायाचित्र देण्यात येईल, असा निर्णय खंडाच्या निर्मितीच्या वेळी घेण्यात आला होता. पण काही चरित्रनायकांच्या कार्याला, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीला विशिष्ट पार्श्वभूमी असते. त्या विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्या व्यक्तीच्या कार्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक असते आणि त्याच्या कार्याचे मूल्यमापन त्या विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात करणे उचित असते. अन्यथा अर्धवट माहितीच्या आधारावर चुकीची प्रतिमा वाचकांच्या मनात निर्माण होण्याचा संभव असतो. यावर साधकबाधक विचार करून या खंडात दोन महत्त्वाचे बदल स्वीकारण्यात आले आहेत. पहिला बदल म्हणजे चरित्रनायकाच्या कार्याची पार्श्वभूमी विशद होण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात पुनरुक्तीचा दोष पत्करून पुरेश माहिती, टिपणनोंदीत समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच वाचकांच्या सुविधेसाठी या टिपणनोंदीसोबत संबंधित चरित्रनायकांची छायाचित्रेही देण्यात आली आहेत.
 चरित्रनोंदींचे स्थूल स्वरूप
 चरित्रकोशातील नोंदींचे स्थूल स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. यातील नोंदी सर्वसाधारणपणे आडनावांनी दिल्या आहेत. पहिल्या ओळीत चरित्रनायकाचे नाव (आडनाव प्रथम ) दिले आहे.
 उदाहरणार्थ :
 तेलंग, काशिनाथ त्रिंबक; तुळजापूरकर, विद्यारण्य दत्तात्रेय
 या सर्वसाधारण धोरणास काही अपवाद करावे लागले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत :
 १. ज्या व्यक्तींची उपनावे लोकमानसात रूढ झालेली आहेत, त्यांची नोंद त्या उपनावांनीच दिलेली आहे.
 उदाहरणार्थ : व्ही. पी. राजा; व्ही. सुब्रमनियन; व्ही. श्रीनिवासन
 २. काही चरित्रनायकांची पूर्ण नावे अनेक प्रयत्न करूनही मिळू शकली नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेली लघुरूप नावे खंडात नाइलाजाने घेण्यात आली आहेत.
 उदाहरणार्थ : गोखले, बी. एन.; दफ्तरी, सी. के. ;
 खंडात ज्या नावाने नोंद देण्यात आलेली आहे, ते नाव मोठ्या जाड ठशात पहिल्या ओळीत दिलेले आहे. नंतरच्या दुसऱ्या ओळीत त्या व्यक्तीचे मूळ नाव - उपनाव - टोपणनाव तिरप्या जाड ठशात दिलेले आहे.
 यानंतरच्या ओळीत त्या व्यक्तीचे एकंदर योगदान दर्शविणाऱ्या क्षेत्रांचा उल्लेख केलेला आहे. त्यापुढच्या ओळीत चरित्रनायकाच्या जन्म व ( दिवंगत असल्यास ) मृत्यू ह्या तारखा दिल्या आहेत. जेथे जन्म अथवा मृत्यूच्या तारखा उपलब्ध नाहीत तेथे केवळ साल व शक्य झाल्यास महिनासुद्धा दिलेला आहे. जन्म-मृत्यू तारखा उपलब्ध नसल्यास 'जन्म - मृत्यू दिनांक अनुपलब्ध' असे देण्यात आले आहे. यानंतर चरित्रनोंदीच्या


१० / न्यायपालिका खंड

शिल्पकार चरित्रकोश