पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शाह, लल्लभाई आशाराम न्यायपालिका खंड पक्ष केंद्रात अधिकारारूढ झाला. जनता सरकारने आणीबाणीच्या काळातील घटनांची चौकशी करण्यासाठी न्या.शाह यांची एक-सदस्य आयोग म्हणून नियुक्ती केली. ‘शाह आयोग’ म्हणून अजूनही हा आयोग ओळखला जातो. आपल्या निर्भीड आणि सडेतोड अहवालात न्या. शाह यांनी आणीबाणीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हा अहवाल गेली कित्येक वर्षे दुर्मीळ झाला होता. इरा शेझियन यांनी तो अलीकडेच पुन:प्रकाशित केला आहे. - शरच्चंद्र पानसे

शाह, लल्लुभाई आशाराम मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ४ फेब्रुवारी १८७३ - लल्लुभाई आशाराम शाह यांचा जन्म गुजरातमध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे वडील आशाराम दलीचंद शाह काठेवाडमधील अनेक संस्थानांचे कारभारी होते. लल्लुभाई शहा यांचे शालेय शिक्षण अहमदाबाद हायस्कूलमध्ये व उच्च शिक्षण अहमदाबादच्या गुजरात महाविद्यालयामध्ये झाले. १८९२ मध्ये गणितात एम.ए. आणि १८९४ मध्ये एलएल.बी. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. त्यानंतर १८९५ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. त्यांना यशस्वी होण्यास वेळ लागला नाही. त्यांचे कायद्याचे ज्ञान आणि वकिलीतील कसब यांमुळे ते प्रसिद्धीस आले. १९१० मध्ये आणि पुन्हा १९११ आणि १९१२-१३ मध्ये हंगामी सरकारी वकील म्हणून लल्लुभाईंची नेमणूक झाली. ते एक अत्यंत उदार सरकारी वकील होते! केवळ आरोपी दोषी ठरून त्याला शिक्षा व्हावी असे नव्हे, तर न्याय झाला पाहिजे आणि तो होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण न्यायालयाला साहाय्य केले पाहिजे, असे ते मानीत. मार्च १९१३ मध्ये न्या.नारायण गणेश चंदावरकरांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला, तेव्हा त्यांच्या जागी लल्लुभाईंची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी लल्लुभाईंचे वय जेमतेम ४० वर्षांचे होते. आताच म्हटल्याप्रमाणे न्यायदान हे महत्त्वाचे, असे न्या. लल्लुभाई मानीत असल्याने, कायद्याच्या तांत्रिक बाबींच्या पलीकडे जाऊन खर्‍या अर्थाने न्याय देण्याचे त्यांचे नेहमी धोरण असे. त्यांचा मूळ विषय गणित असल्याने कुठल्याही खटल्यामधील विवाद्य प्रश्नांचे किंवा मुद्द्यांचे तर्कशुद्ध आणि सूत्रबद्ध विश्‍लेषण आणि विवेचन ते सहजगत्या करीत. त्या काळात हिंदू कायद्यासंबंधीचे अनेक खटले न्यायालयासमोर सतत येत असल्याने, त्यातील बारकावे समजावेत म्हणून न्या.शाह न्यायाधीश झाल्यानंतर संस्कृत शिकले आणि प्राचीन स्मृती वगैरे ग्रंथांतील वचनांचा अर्थ बदलत्या काळानुरूप लावण्याचे प्रयत्न त्यांनी केले. न्या.शाह यांनी काही काळ उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई उच्च न्यायालयाच्या भारतीय न्यायाधीशांत न्या.लल्लुभाई शाह यांचे स्थान महत्त्वाचे आहे, यात शंका नाही. - शरच्चंद्र पानसे

शेलत, जयशंकर मणिलाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश १६ जुलै १९०८ जयशंकर मणिलाल शेलत यांचा जन्म उमरेठ येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण उमरेठ येथे आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. तेथून इंग्रजी विषय घेऊन बी.ए.ची. पदवी घेतल्यानंतर शेलत लंडनला गेले ११६ शिल्पकार चरित्रकोश श |