पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड वाहनवटी, गुलाम एसनजी वरियावा, सॅम नरिमन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ८ नोव्हेंबर १९४० सॅम नरिमन वरियावा यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे एलएल.एम. पर्यंतचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. २२जून१९६४ पासून ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली करू लागले. जरुरीप्रमाणे ते मुंबई शहर दिवाणी न्यायालयातही वकिली करीत. ते सिडनहॅम महाविद्यालयात कायद्याचे अर्धवेळ प्राध्यापकही होते. २१ नोव्हेंबर १९८६ रोजी वरियावा यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. १२ जून १९८७ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. २५ मे १९९९ रोजी त्यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून झाली. १५ मार्च २००० रोजी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. ७ नोव्हेंबर २००५ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. - शरच्चंद्र पानसे

वाहनवटी, गुलाम एसनजी भारताचे विद्यमान अ‍ॅटर्नी-जनरल ७ मे १९४९ गुलाम एसनजी वाहनवटी यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून बी.ए.(ऑनर्स) आणि शासकीय विधि महाविद्यालयातून एलएल.बी. या पदव्या प्रथम वर्गात प्राप्त केल्या. विधि महाविद्यालयात एलएल.बी. करीत असताना ते सेंट झेवियर्स आणि सोफिया महाविद्यालयात विविध विषय शिकवीत असत. १९७२ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. त्याबरोबरच १९७६ पर्यंत शासकीय विधि महाविद्यालयामध्ये अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी कायद्याच्या विविध विषयांचे अध्यापन केले. अठरा वर्षांच्या अनुभवानंतर १९९० मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. १९९९ पर्यंत त्यांनी वकिली केली. या काळात त्यांनी मुंबई व इतर उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय व विविध न्यायाधिकरणांसमोर कायद्याच्या सर्व शाखांमधील विविध प्रकारचे खटले लढविले. डिसेंबर १९९९ मध्ये त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे ‘अ‍ॅडव्होकेट-जनरल’ म्हणून झाली. त्यानंतर जून २००४ मध्ये ते भारताचे ‘सॉलिसिटर-जनरल’ आणि जून २००९ मध्ये ‘अ‍ॅटर्नी-जनरल’ झाले. या नात्यांनी त्यांनी अनुक्रमे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांत युक्तिवाद केले. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वेळोवेळी भारताचे प्रतिनिधित्व केले. सप्टेंबर २००३ ते जून २००४ पर्यंत ते महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष होते. - शरच्चंद्र पानसे

व । शिल्पकार चरित्रकोश ११३