पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेंटिन, बख्तावर न्यायपालिका खंड लेंटिन, बख्तावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश २५ जुलै १९२७ - २२ एप्रिल २००० बख्तावर लेंटिन यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट मेरीज् हायस्कूल आणि सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय विधि महाविद्यालयामधून एलएल.बी. पदवी संपादन केली. त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि २६ जानेवारी १९५० रोजी मिडल् टेम्पलमधून बॅरिस्टर झाले. मुंबईला परत आल्यावर त्यांनी त्यावेळचे प्रसिद्ध फौजदारी वकील के.ए.सोमजी यांच्या हाताखाली वकिलीचे धडे घेण्यास सुरुवात केली. २२ मार्च १९५० पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्ही विभागांत दिवाणी आणि फौजदारी खटले लढविण्यास सुरुवात केली. जरुरीनुसार ते मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयातही काम पाहत असत. २२ मार्च १९६५ रोजी मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून लेंटिन यांची नियुक्ती झाली. १६ एप्रिल १९७० रोजी ते त्या न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश झाले. २८ मार्च १९७३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २७मार्च१९७५ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. २४जुलै१९८९ रोजी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते वेळोवेळी लवाद म्हणून काम करीत असत. १९८६ मध्ये मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात भेसळयुक्त औषधांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने न्या.लेंटिन यांची एक-सदस्य चौकशी आयोग म्हणून नियुक्ती केली. त्यांनी सतरा महिने चौकशी करून, एकशे वीस साक्षीदारांची साक्ष घेऊन एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर केला. त्यात राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अत्यंत निर्भीड आणि सडेतोड चिकित्सा त्यांनी केली. न्या. लेंटिन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांपैकी झुलेलाल पुरस्कार, जागतिक झोरोस्ट्रियन संघटनेचा पुरस्कार, ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हिल साउथ’चा ‘चॅम्पियन ऑफ ह्युमन राइट्स्’ पुरस्कार आणि ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअर’चा जीवनगौरव पुरस्कार (लाइफटाइम अचीव्हमेंट अ‍ॅवॉर्ड) यांचा विशेष उल्लेख करता येईल. कडक शिस्तीचे आणि ठाम विचारांचे पण विनयशील आणि सभ्य न्यायाधीश म्हणून न्या.लेंटिन यांचा लौकिक होता. - शरच्चंद्र पानसे

अतिरिक्त मुख्य न्यायाधीश झाले. २८ मार्च १९७३ शिल्पकार चरित्रकोश