पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड

रानडे, महादेव गोविंद
 कायदेमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कायदेमंडळाच्या बैठकीत ते सक्रिय भाग घेत आणि विविध विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे करीत. ते कायदेमंडळाचे सदस्य असताना भारत सरकारने संपूर्ण देशासाठी नेमलेल्या आर्थिक समितीवर मुंबई सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली. दरम्यान त्यांना बढती मिळून आधी त्यांना हंगामी विशेष न्यायाधीश म्हणून आणि नंतर कायम विशेष न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. आर्थिक समितीच्या अहवालाला रानड्यांनी आपली सविस्तर भिन्नमतपत्रिका जोडली. १८८७ मध्ये सरकारने त्यांना सी.आय.ई. हा किताब दिला. 

 सप्टेंबर १८९३ मध्ये न्या.काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन झाले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात रिकाम्या झालेल्या जागेवर रानड्यांची नियुक्ती नोव्हेंबर १८९३ मध्ये झाली. त्यांची उच्च न्यायालयातील कारकीर्द सात वर्षे दोन महिने इतकी होती. त्यांनी नेहमी उच्च न्यायालयाच्या अपील शाखेतील खटले चालविले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकंदर सुमारे ३३७ निकाल दिले. त्यांपैकी सुमारे १५६ निकालपत्रे त्यांनी खंडपीठाची एकमताची म्हणून किंवा स्वत:ची वेगळी म्हणून लिहिली आहेत. हिंदू कायद्यातील विविध प्रश्नांवर त्यांच्यासमोर अनेक खटले आले. यमुनाबाई वि. मनुबाई, कुबेर वि. बुधिया, भगवान वि. मूळजी, महाराणा फतेहसिंहजी वि. कुवर हरिसिंहजी फतेहसिंहजी हे त्यातील विशेष उल्लेखनीय खटले म्हणता येतील. या प्रत्येकात न्यायालयासमोर आलेल्या प्रश्नाचे अतिशय बारकाईने विवेचन करून न्या. रानड्यांनी अचूक निर्णय दिले.   काही महत्त्वाचे फौजदारी खटलेही अपिलांत न्या.रानड्यांसमोर चालले. त्यांतील पहिला खटला कहानजी धरमजी आणि इतर यांनी केलेल्या अपिलाचा होता. त्याला १८९३ मध्ये मुंबईत झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीची पार्श्वभूमी होती. इस्लामपूर येथील ‘प्रतोद’ साप्ताहिकाचे रामचंद्र नारायण

यांच्याविरुद्धचा राजद्रोहाचा खटला हा दुसरा महत्त्वाचा फौजदारी खटला होय. यात न्या.रानड्यांनी आपल्या वेगळ्या निकालपत्रात ‘इंडियन पीनल कोड’च्या कलम १२४-अ मधील ‘डिसअफेक्शन’ या शब्दाचा अर्थ बारकाईने विशद करून सांगितला. १८९७ मध्ये पुण्यात झालेल्या रँड व आयर्स्ट यांच्या खुनाबद्दल शिक्षा झालेल्या चापेकर बंधूंचे अपील ज्या खंडपीठासमोर आले, त्यात न्या.रानडे होते. अनंत विनायक पुराणिक खटलाही उल्लेखनीय होता.   शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच सरकारी नोकरीत प्रवेश करून, त्यातही बहुतेक काळ विविध ठिकाणी न्यायखात्यात आपले कर्तव्य बजावीत असताना आणि नंतर आयुष्याची शेवटची सात वर्षे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून आपल्या देशबांधवांची खालच्या न्यायालयांच्या निकालाविरुद्धची अपिले ऐकून त्यांवर निर्णय देताना न्या. रानड्यांनी कायद्याची जाण, व्यापक न्यायबुद्धी, देशभक्ती आणि मानवता यांमध्ये असामान्य समतोल साधून निर्णय दिले. हे सर्व करीत असतानाच त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा सर्व विषयांवर उदंड लेखन केले. ‘राइझ ऑफ द मराठा पॉवर’ हा मोलाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला, सामाजिक परिषद, प्रार्थनासमाज आणि इतर अनेक व्यासपीठांवरून अनेक व्याख्याने दिली. मुंबई, पुणे व नाशिक येथे जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील सार्वजनिक कार्यांत भाग घेऊन अनेक संस्था स्थापन केल्या. भावी पिढ्यांना प्रेरक ठरेल असे हे विविधांगी चिरस्थायी कार्य करून न्या.रानड्यांनी आधुनिक महाराष्ट्राचा सर्वार्थांनी पाया घातला. 

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ :

  1. न. र. फाटक; ‘न्या. महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र’, नीलकंठ प्रकाशन, तिसरी आवृत्ती, १९६६.
  2. नरेंद्र चपळगांवकर; ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’, मौज प्रकाशन, २०१०.
शिल्पकार चरित्रकोश

११