पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड बोस, विवियन महाविद्यालय आणि पेम्ब्रुक महाविद्यालयामध्ये झाले. तेथे त्यांनी अनुक्रमे बी.ए. व एलएल.बी. या पदव्या संपादन केल्या. १९१३मध्ये ते मिडल् टेम्पलमधून बॅरिस्टर झाले. परत येऊन त्यांनी नागपूरला वकिली सुरू केली. १९२४ पासून १९३० पर्यंत ते नागपूर विद्यापीठातील कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य होते. १९३० ते १९३६ या काळात त्यांनी मध्य प्रांत आणि वर्‍हाड सरकारचे कायम वकील म्हणून काम पाहिले. दरम्यान १९३१ पासून १९३४ पर्यंत त्यांची नियुक्ती नागपूरचे अतिरिक्त न्याय आयुक्त म्हणून झाली. १९३६मध्ये नागपूर उच्च न्यायालय स्थापन झाल्यावर बोस यांची नियुक्ती त्या न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. नागपूर उच्च न्यायालयाच्या पहिल्या पाच न्यायाधीशांपैकी ते एक. या पाचपैकी दोन भारतीय होते. एक बोस आणि दुसरे भवानीशंकर नियोगी. तेरा वर्षांनंतर, म्हणजे १९४९मध्ये न्या.बोस नागपूर उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. मार्च १९५१मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. नागपूर उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयावर जाणारे ते पहिले न्यायाधीश होत. ८जून१९५६ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे तात्पुरते न्यायाधीश (अ‍ॅडहॉक जज) म्हणून काम पाहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक अत्यंत विद्वान, सहृदय आणि साक्षेपी न्यायाधीश म्हणून न्या.बोस ओळखले जातात. कायद्याच्या क्षेत्राव्यतिरिक्त न्या.बोस यांचा स्काउट चळवळीशी जवळचा संबंध होता. १९२१ पासून १९३४ पर्यंत ते मध्य प्रांत आणि वर्‍हाड बॉय स्काउट्स् असोसिएशनचे मानद प्रांतिक सचिव होते, तर १९३४ पासून १९३७ पर्यंत प्रांतिक आयुक्त होते. १९४७ पासून १९४९ पर्यंत ते जागतिक स्काउट समितीचे सदस्य होते, तर नोव्हेंबर १९५७ पासून नोव्हेंबर१९५९पर्यंत भारत स्काउटस् गाइडस् संघटनेचे मुख्यआयुक्त होते. ‘इंडियन ऑक्झिलरी फोर्स’ या स्वयंसेवक दलाशीही न्या.बोस संबंधित होते. या दलाच्या नागपूर रेजिमेंटचे ते कॅप्टन होते. या दलातील सेवेसाठी त्यांना अनेक पदके मिळाली होती. न्या.बोस यांना छायाचित्रणाची, खेळांची, प्रवासाची आणि मोटार चालविण्याची आवड होती. आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलाला बरोबर घेऊन त्यांनी भारतापासून इंग्लंडपर्यंतचा प्रवास स्वत: मोटार चालवीत केला होता. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. हिदायतुल्ला, मोहम्मद; “माय ओन बॉस्वेल” (आत्मचरित्र); अर्नाल्ड - हनेमान; १९८०.

शिल्पकार चरित्रकोश