पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बावडेकर, राजाराम श्रीपाद न्यायपालिका खंड बावडेकर, राजाराम श्रीपाद मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १६ सप्टेंबर १८९८ - १९ ऑक्टोबर १९६१ राजाराम श्रीपाद बावडेकर यांचा जन्म कोल्हापूरला एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरला कोल्हापूर हायस्कूलमध्ये आणि उच्च शिक्षण अगोदर कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आणि नंतर पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात झाले. पहिल्यापासूनच ते हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. डेक्कन महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची बी.ए. पदवी घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथूनही १९२२ मध्ये बी.ए. पदवी संपादन केली. त्याचवेळी त्यांनी आय.सी.एस. परीक्षेसाठी अभ्यास केला व त्याच वर्षी आय.सी.एस. उत्तीर्ण झाले. भारतात परतल्यावर त्यांची पहिली नियुक्ती नाशिकचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. नंतर त्यांनी पूर्व खानदेश (जळगाव) जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांना जमीन महसूल आणि वतनांच्या कायद्याची पूर्ण माहिती झाली आणि या गोष्टीचा ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्यावर त्यांना उपयोग झाला. १९२७मध्ये ते न्यायखात्यात गेले. १९३४ पर्यंत ते विविध ठिकाणी सहायक न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीश होते. १९३४ ते १९३८ त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेचे रजिस्ट्रार म्हणून झाली. १९३८ ते १९४५ ते पुन्हा विविध ठिकाणी जिल्हा न्यायाधीश होते. १९४५मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १५ डिसेंबर १९५७ रोजी राजीनामा देऊन ते मुदतीपूर्वी निवृत्त झाले. उच्च न्यायालयातील कारकिर्दीत न्या.बावडेकर यांनी एक अत्यंत निष्पक्ष, न्यायप्रिय आणि बुद्धिमान न्यायाधीश म्हणून लौकिक मिळवला. ते अत्यंत खुल्या मनाचे आणि समतोल विचारांचे होते. वरिष्ठ आणि कनिष्ठ वकिलांत ते भेदभाव करीत नसत. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटल्यामुळे पुण्यात महापूर आला. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्य चौकशी आयोग म्हणून बावडेकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा राज्य सरकारने २४ जुलै१९६१ रोजी केली. चौकशीचे प्राथमिक काम पूर्ण करून बावडेकर सार्वजनिक चौकशी सुरू करणार होते, परंतु १३ ऑक्टोबर १९६१ राजी त्यांनी त्या आयोगाचा राजीनामा दिला. त्यानंतर आठवड्याच्या आतच, १९ ऑक्टोबर १९६१ रोजी न्या.बावडेकरांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर न्या.वि.अ.नाईक यांनी चौकशी पूर्ण केली. न्या.बावडेकर अनेक वर्षे मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष होते. ते अविवाहित होते. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९६१.

बोस, विवियन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ९ जून १८९१ - २९ नोव्हेंबर १९८३ विवियन बोस यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठातील डल्विच् शिल्पकार चरित्रकोश