पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला.pdf/८१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डॉ. मनीषा पाटील, वैशिष्ट्यपूर्ण चित्रनिर्मितीसोबतच कलाविषयक लेखन व संशोधन करतात. कला इतिहास या विषयांत प्रावीण्य मिळवलेल्या मनीषा यांची देशात अनेक प्रदर्शने झाली असून पीएचडीसाठी मार्गदर्शक आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे अधिष्ठाता म्हणून काही काळ कार्यरत होत्या.


प्रभाकर पाटील, भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रनिर्मिती करणे व कलाविषयक उपक्रमात उत्साही सहभाग, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. देशात व परदेशात अनेक प्रदर्शने झाली असून कला महाविद्यालयातील तरुणांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


रवी मंडलिक, अमूर्त शैलीत चित्रनिर्मिती करणारे सुप्रसिद्ध चित्रकार. अमीर खान यांच्या 'धोबीघाट' या चित्रपटाशी संबंधित चित्रनिर्मिती केली आहे. देश-परदेशात त्यांची अनेक प्रदर्शने झाली आहेत.


मनोज दरेकर, जी.डी. आर्ट (उपयोजित कला) कोल्हापूर येथे शिक्षण पूर्ण केले. गेली १६ वर्षे कला निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. एकल व समूह अशी बारा प्रदर्शने झाली आहेत. जुन्या चित्रकारांची माहिती व चित्रे जमविणे हा त्यांचा छंद आहे. ते कलाविषयक लेखन करतात.


अनिल अभंगे, चामडी कमावणारे कामगार, इमारती रंगविणारे रंगारी, खाणकामगार अशा उपेक्षितांवर त्यांनी चित्रमालिका केल्या असून प्रदर्शने भरविली आहेत. ते नाशिक कलानिकेतन येथे अध्यापन करतात. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली असून विविध कलाविषयक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.


यशवंत देशमुख, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण पूर्ण केले. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीची बेंद्रे-हुसेन शिष्यवृत्ती मिळाली. अनेक ठिकाणी त्यांची एकल व समूह प्रदर्शने झाली आहेत.


श्यामकांत जाधव, रा.शि. गोसावी कला महाविद्यालयातून जी. डी. आर्ट (पेंटिंग) व आर्ट मास्टर अशा पदविका प्राप्त केल्या. अनेक वृत्तपत्रे, मासिके यामधून ते सातत्याने लेखन करीत असतात. ‘रंग चित्रकारांचे’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कलावंत व लेखक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.



शिल्पकार चरित्रकोश