पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या साऱ्या चक्रव्यूहातून मार्ग काढत, महाराष्ट्राच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रांतील शिल्पकारांचा अल्पचरित्रात्मक कोश आज वाचकांपुढं सादर होत आहे. यातील अल्पचरित्र या संज्ञेकडे वाचकांचं लक्ष वेधणं आवश्यक वाटतं. या कोशांच्या नोंदींचं स्वरूप आणि व्याप्ती यांचे निकष निश्चित करण्यासाठी प्रबंध संपादक मंडळानं काही नियम केले होते. त्यानुसार प्रत्येक नोंदींची कमाल मर्यादा १२०० शब्दांवर सीमित केली होती. उपलब्ध माहिती, शिल्पकाराच्या कार्याचं स्वरूप यांनुसार ही मर्यादा किमान ३५० शब्दांची असावी असाही नियम होता. या नियमांचं काटेकोर पालन ह्या विज्ञानकोशाच्या संपादनाच्या वेळी केलं गेलं आहे. या कोशाची समीक्षा करताना संपादनावर पडलेल्या या मर्यादांचंही भान ठेवणं आवश्यक ठरावं. तरीही त्यावरची वाचकांची वा समीक्षकांची भलावण करणारी प्रतिक्रिया त्या शिल्पकारांच्या महनीय कामगिरीपोटी असेल पण आलोचना करणाऱ्या प्रतिक्रियांचं उत्तरदायित्व संपादकांनी स्वीकारायला हवं, अशीच आमची भावना आहे. - बाळ फोंडके / अ. पां. देशपांडे २८ / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश