पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अत्याधुनिक शाखांचा समावेश तर करायलाच हवा. तीच बाब उपयोजित विज्ञानशाखांची व तंत्रज्ञानशाखांचीही आहे. या विषयांमध्ये मूलभूत संशोधन करून मोलाची भर घालणाऱ्या महाभागांना शिल्पकार म्हणून गणलं जाणं स्वाभाविकच होतं, पण विज्ञान शिक्षण आणि विज्ञान प्रसार या समाजात विज्ञानाची वेल रुजण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षेत्रांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या महाभागांनाही त्या पंक्तीत स्थान देणं आवश्यक ठरतं. तरीही, लक्षणीय किंवा देदीप्यमान कामगिरीचे निकष कोणते, असा सवाल उभा राहण्याचा संभव आहे. त्या बाबतीत मात्र संदिग्धता नाही. ते निकष ठोक आहेत. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांना मानसन्मान प्राप्त झालेले आहेत, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांचं संचालकत्व ज्यांनी भूषविलं आहे, ज्यांच्या संशोधनाचा गौरवपर उल्लेख मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून झालेला आहे, ज्यांनी प्रयोगशाळेतील संशोधन घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे, खास करून शेतकीमध्ये महाराष्ट्रातील शेतीच्या समस्यांवर तोडगे शोधण्याचे विशेष प्रयत्न ज्यांनी केले आहेत, ज्यांनी विज्ञानाधिष्ठित उद्योगधंद्यांची स्थापना करून तंत्रज्ञान विकासात मोलाची भर घातली आहे, ज्यांनी विज्ञानशिक्षणाचा पाया भक्कम करण्याची कामगिरी बजावलेली आहे, अशांना शिल्पकारांमध्ये स्थान मिळालेलं आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या प्रयत्नांमध्ये मात्र महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. यातील बहुतेक योगदान स्वयंसेवी संस्थांचंच आहे. त्यांच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या दिग्गजांनाही शिल्पकार मानणं आवश्यक आहे. __ हे निकष जरी ठोस असले, तरी त्यानुसार ज्यांची निवड होऊशकते अशा सर्वांचाच समावेश या कोशात आहे, असा दावा मात्र करता येणार नाही. दस्तऐवजांच्या दफ्तरीकरणाबाबत आपल्या देशातच एकंदरीत भयानक अनास्था आहे. अनेक धडाडीच्या धुरिणांची विश्वासार्ह चरित्रविषयक माहिती मिळणं त्यामुळंच दुरापास्त झालं आहे. त्यांच्या वैज्ञानिक कार्याची बरीचशी माहिती मिळत असली तरी त्यांच्या वैयक्तिक माहितीची वानवाच आहे. कित्येकांच्या वैज्ञानिक शोधनिबंधांचा उल्लेख इतरत्र आढळतोय, पण ते मूळ शोधनिबंध अवलोकनासाठीही उपलब्ध नाहीत. ज्यांच्या काही निकटच्या नातलगांचा वा वारसांचा वा शिष्यांचा ठावठिकाणा लागणं शक्य आहे, अशांकडून काही माहिती मिळू शकते. कित्येक वेळा तीही तुटपुंजी असते किंवा त्यावर भावनात्मक जवळिकीचं सावट पडलेलं असतं. अशा वेळी काही अतिशय अवघड निर्णय घ्यावे लागतात. जी माहिती मिळाली, तिच्या विश्वासार्हतेची खात्री नसतानाही तिचा समावेश करावा की ती वगळण्याचा मार्ग पत्करावा, अशा दुविधेत पडल्यावर ती वगळण्याचा सोईस्कर मार्ग पत्करण्याचा मोह होतो. ___ महाराष्ट्रात विज्ञान प्रसाराचं काम अनेक संस्था गेली कित्येक वर्षं जोमानं करीत आहेत. 'मराठी विज्ञान परिषद' हे त्यांतील एक ठळक नाव. ही संस्था गेली ४४ वर्षे नाना प्रकारे विज्ञान प्रसार करीत आहे. १९६६पासून २०१०पर्यंत मराठी विज्ञान परिषदेनं अखंडपणे चव्वेचाळीस अधिवेशनं भरवली आहेत. इतर संमेलनात पडला, तसा खंड एकदाही न पडता या अधिवेशनांचं अध्यक्षपद मराठी भाषक वैज्ञानिकानं भूषविलं आहे. (अपवाद १९९५ सालचे अध्यक्ष श्री. अरविंद गुप्ता आणि २०१० सालचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम.) या अधिवेशन परंपरेनं वैद्यक, अभियांत्रिकी, भौतिकी, रसायन, जीव, शेती, समुद्रतळ, लोकसंख्या, संरक्षण, शिक्षण, आहार, भूशास्त्र, पर्यावरण, अर्थशास्त्र, रेल्वे इत्यादी विषयांतील वैज्ञानिकांना अध्यक्षपद देऊन त्या-त्या विषयातील त्यांच्या कामाच्या निमित्तानं हे विषय ग्रामीण आणि शहरी समाजापुढे आणून त्या-त्या विषयात समाजाचं प्रबोधन केलं. याचा आणखी एक फायदा असा झाला की, ही क्षेत्रं पालकांना माहीत झाल्यानं, ही क्षेत्रां शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत, हे ध्यानात आलं आणि व्यावसायिक आणि शैक्षणिक ह्या दोन्ही दृष्टींनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांना विविध पर्याय उपलब्ध झाले. शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / २७